मिरज : गणेश तलावाला हवा ‘ऑक्सिजन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

मिरज : गणेश तलावाला हवा ‘ऑक्सिजन’

मिरज : जिल्ह्यातील सर्वांत मोठी, ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक मिरजेत थाटात पार पडली. यंदा निर्बंधमुक्त उत्साह दिसला. गणेश तलावात १७८ मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आता या तलावाचे आरोग्य जपायला हवे. तलावातील जीव जपायला हवेत. त्यात मिरजकरांनी पुढाकार घेतला पाहिजे. महापालिकेला जागं केलं पाहिजे; अन्यथा मिरजेतील रस्ते व विकासाचा जसा खेळखंडोबा झाला आहे, तशीच अवस्था गणेश तलावाची होऊ शकते.

मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. गणेश तलावाच्या दिशेने जाणाऱ्या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी जिल्ह्यातून लोक येतात. आता तलावात विसर्जनासाठी आधुनिक व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. गरज आहे ती विसर्जन सोहळ्यानंतर तलावाचे आरोग्य जपण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची. गणेश तलाव मिरजेची संपत्ती आहे. त्या तलावाची अवस्था जर काळ्या खणीसारखी व्हायची नसेल तर दरवर्षी तलाव स्वच्छता, पाणी शुद्धीकरण व कमीत कमी प्रदूषण यासाठी मिरजकरांचा आग्रह आणि महापालिकेचा प्रयत्न असला पाहिजे. तलावात वर्षानुवर्षे प्लास्टर ऑफ पॅरिस साठून राहणे घातक आहे. विसर्जनानंतर काही काळाने ती बाजूला काढणे शक्य होईल का, यावर काम व्हायला हवे. याआधी २००९-१० साली गाळ उपसा केला होता. सध्या दहा वर्षांचे प्लास्टर तळाशी आहे.

सव्वादोनशे वर्षांचा जुना तलाव...

मिरजेला पाण्याचे दुर्भिक्ष्य प्रचंड होते. घरोघरी आड होते. नदी तीन किलोमीटर दूर. त्यामुळे गावातील विहीर, आडांना झरे मिळावेत म्हणून तलाव काढायचे ठरले. निमजच्या माळावरून येणारे लोंढे येऊन ते तलावाला मिळायचे. तलावातून दगड काढून कृष्णाघाट व माधवजी मंदिर बांधकामासाठी ते वापरले. तलावाचे काम १७८५ नंतर सुरू झाले. १८०० साली पाणी पूजन झाले. त्याच्या समोरच गणेश मंदिर बांधले गेले आणि त्याला गणेश तलाव असे नाव पडले, असे इतिहास अभ्यासक मानसिंग कुमठेकर यांनी सांगितले.

कासव, मासे जीव गमावतात...

गणेश तलावात दरवर्षी उत्सवानंतर मासे आणि कासव मेल्याचे आढळून येते. या जीवांचे ते घर आहे. ते पाण्याची शुद्धता राखण्याचेही काम करतात. पाण्यातील अनावश्‍यक वनस्पती, मृत जीव खातात. तेच मरायला लागले तर पाण्याचे प्रदूषण वाढणारच आहे. हे जीव वाचले पाहिजेत, यासाठी कमीत कमी रसायन व जीवांना त्रास होईल, अशा वस्तूच तलावात न जातील, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

रसायनयुक्त रंग, तेलाचे तवंग पाण्यावर...

गणेश विसर्जन सोहळ्यानंतर गणेश तलावाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. बाप्पांना निरोप दिल्यानंतर रसायनयुक्त रंग, तेल आदीचे तवंग पाण्यात येतात. ते घातक आहेत. ते काढता येतील किंवा त्यापासून होणारी हानी टाळता येईल, अशी व्यवस्था केली पाहिजे. या काळात अधिकाधिक ऑक्सिजन प्रवाहित कसे राहील, याबाबत उपाययोजना केल्या पाहिजेत.

नैसर्गिक रंग वापराची सक्ती हवी...

गणेशोत्सव हा भावनिक सण आहे. तो परंपरेप्रमाणे साजरा करताना भावनांना धक्का न लावता काही बदल करता येतील का, यावर बारकाईने काम करण्याची गरज आहे. त्यात विशेषतः मूर्तीला दिला जाणारा रंग हा रसायनमुक्त व निसर्गपूरक असेल तर पाण्याचे प्रदूषण कमी होईल. त्याबाबत सरकारने थोडी सक्तीची भूमिका घ्यायला हवी. असे रंग प्राधान्याने वापरून मूर्तिकारांनीही त्यात आपला वाटा उचलायला हवा.

Web Title: Miraj Ganesh Lake Needs Oxygen Ganesha Immersion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..