मिरज शासकीय वैद्यकीय कोविड रूग्णालयाला व्हेंटिलेटर, एचएफएनओ

विष्णू मोहिते
Tuesday, 25 August 2020

वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये जिल्हा प्रशासनाने व्हेंटिलेटर व विशेषतः एचएफएनओ या विशेष उपचार पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली.

सांगली : वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये जिल्हा प्रशासनाने व्हेंटिलेटर व विशेषतः एचएफएनओ या विशेष उपचार पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली. मिरज येथील रुग्णालयामध्ये 54 व्हेंटीलेटर व 16 एच. एफ. एन. ओ. उपकरणे गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध आहेत. 

तथापि, या उपकरणांना लागत असणाऱ्या ऑक्‍सिजनचा वाढीव पुरवठा करण्याकरिता ऑक्‍सिजनचा अतिरिक्त क्षमतेचा टॅंक उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे होते. आत्तापर्यंत 6 के एल या क्षमतेचा ऑक्‍सीजन टॅंक होता. वाढती रुग्ण संख्या पाहता ऑक्‍सिजनची गरज प्रचंड प्रमाणात वाढल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची क्षमता दुप्पट म्हणजेच 12 के एल करण्याचा निर्णय तात्काळ घेतला व अंमलबजावणी सुद्धा केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, सद्यस्थितीत मिरज येथील शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये 315 ऑक्‍सिजन बेड उपलब्ध आहेत. यामुळे गंभीर व अतिगंभीर रुग्णांची तात्काळ व अधिक चांगल्या पद्धतीने सुरक्षित उपचार होत आहेत. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये गरीब तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांचे उपचार अधिक प्रमाणात होत असल्याने शासनामार्फत आवश्‍यक प्रमाणात ऑक्‍सिजन पुरवठा तात्काळ होणे अत्यंत गरजेचे होते. ऑक्‍सिजन टॅंकची क्षमता वाढवल्यामुळे सर्व रुग्णांना ही एक दिलासा मिळणारी बाब आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी अधिक लक्ष घालून तत्पर कार्यवाही केल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.' 
 
1333 रुग्णांना डिस्चार्ज 
कोरोना साथ सुरू झाल्यानंतर मिरज कोविड रुग्णालयामध्ये आजतागायत 1796 रुग्णांना उपचार करण्यात आलेले आहेत. त्यामधील 1333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. रुग्णांची बरे होण्याची टक्केवारी 73.55 आहे. सदर रुग्णालयातील रिकव्हरी रेट हा राष्ट्रीय निर्देशांकापेक्षा चांगला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.5 टक्के असून तो राष्ट्रीय निर्देशांकच्या बरोबर आहे. आजतागायत मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वायरल रीसर्च डिसीज लॅबोरेटरीमध्ये 49 हजार 66 इतक्‍या स्वॅबच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 70.78 टक्के इतके रुग्णांना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत व पॉझिटिव्हिटी रिपोर्टची टक्केवारी 14.24 टक्के आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj Government Medical Kovid Hospital Ventilator, HFNO