मिरजेत गटारगंगेमुळे जगणे मुश्‍कील, हजारो आजारी, शेकडोंची उपासमार,  कारभारी टक्केवारीत मश्‍गुल 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

गेल्या दहा दिवसांपासुन मिरजेतील बस स्थानक, आणि रेल्वे स्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुूंब भऱला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले आहे. 

 

मिरज (सांगली) - गेल्या दहा दिवसांपासुन मिरजेतील बस स्थानक, आणि रेल्वे स्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुूंब भऱला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले आहे. एवढे विदारक चित्र असुनही शहराचे कारभारी मात्र आपआपल्या मस्तीत मश्‍गुल आहेत. एकीकडे सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ सुरू असुनही कारभा-यांचे वर्तन मात्र संतापजनक असल्याने रस्त्यावरील वाहत्या गटारगंगेत महापालिकेतील सत्ताधा-यांनाही गटागंळ्या खाव्या लागणार आहेत हे निश्‍चीत. 

मुळातच मिरज शहर हे वैद्यकिय केंद्र असले तरी सध्या मात्र याच वैद्यकिय नगरीला अस्वच्छतेने सध्या ग्रासले आहे. त्यातच शहराची भौगोलिक रचनाही तशी विचीत्र आहे. याचा विचार करुनच साठ वर्षांपुर्वीच्या तत्कालिन नगरपालिका पदाधिका-यांनी मिरज शहरातील सांडपाण्याच्या निच-याची अतिशय चांगली शाश्वतत व्यवस्था केली आणि हे सांडपाणी मिरज बेडग रस्त्यावर एका प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करुन तेथील शेतीला दिले. ज्यामुळे कृष्णा नदीपात्रात हे पाणी पोहचले नाही.

यासाठी निष्णात अभियंत्यानी आपले कौशल्य पणाला लावले. आणि ही सुंदर योजना अमलांत आणली. पण गेल्या पस्तीस वर्षात मिरजेतील तत्कालिन आणि विद्यमान कारभा-यांनी नेमक्‍या याच सांडपाण्याच्या योजनेचे तीन तेरा केले. आणि या विध्वंसात भर घातली ती निव्वळ पगार आणि सोयीसाठी बदलुन आलेल्या खाऊपासरी अभियंत्यानी त्यामुळे एकुणच सांडपाण्याच्या निच-याचे नियोजनच कोलमडले. ज्याची मोठी किंमत या परिसरातील सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना मोजावी लागते आहे. मिरज शहरातील सगळे सांडपाणी सध्या बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात साठले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj Gutter Ganga makes life difficult, thousands sick, hundreds hungry, stagnant