Miraj: कृपामाई समोरील अतिक्रमण हटवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण

मिरज : कृपामाई समोरील अतिक्रमण हटवले

मिरज : रेल्वेच्या सीनिअर सेक्शन कार्यक्षेत्र विभागाकडून सांगली-मिरज रोडवरील कृपामाई समोरील रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे विशेष मोहिमेद्वारे हटवण्यात आली. गेली कित्येक वर्षे अतिक्रमणाबाबत पूर्वकल्पना देऊनही अतिक्रमणे जैसे थे होती. मात्र आज विशेष मोहीम राबवित तसेच आरपीएफ, जीआरपीएफ आणि सांगली पोलिसांची मदत घेत ही कारवाई करण्यात आली. यावेळी परप्रांतीय मूर्तिकारागिरांचे तंबू, पान टपऱ्या, सलून, दुकाने, झोपडपट्ट्या यांसह तीसहून अधिक अतिक्रमणे काढून रेल्वेचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

या मोहिमेत रेल्वे सीनिअर सेक्शन कार्यक्षेत्राचे प्रमुख श्रवणलाल भिल, सहाय्यक प्रमुख समीर सातारकर, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक सतवीर सिंह, जीआरपीएफचे निरीक्षक संभाजी काळे, गांधी चौकीचे सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोहीम पार पडली. मिरज रेल्वेचे तब्बल सात किलोमीटरपर्यंत कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी नागरिकांकडून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. याची रेल्वेकडून गंभीर दखल घेत परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

रेल्वेस्थानका शेजारील हैदरखाण विहिरी नजीक थाटलेले अतिक्रमण देखील लवकरच काढणार असल्याचे विभाग प्रमुख समीर सातारकर यांनी सांगितले. तेथील नागरिकांना यासंदर्भात नोटीस बजाविण्यात आले आहे. मात्र आद्यापही दखल घेतली नसल्यामुळे लवकरच हैदरखाण विहीर परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहे.

रेल्वेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र गेली अनेक वर्षे रेल्वे स्थानकाच्या दुतर्फा असलेली गाळेधारकांचे अतिक्रमण काढण्याचे धाडस रेल्वे विभागाकडून दाखवले गेले नाही. मात्र इतर ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात रेल्वे धन्यता मानत आहे. प्रथम गरजेचे अतिक्रमण काढणे सोयीचे ठरणारे आहे. यामुळे रेल्वेचा रस्ता अतिक्रमणमुक्त होऊन प्रवाशांना चालणे योग्य होईल.

- अॅड. ए. ए. काझी, रेल्वे प्रवासी संघटना

loading image
go to top