esakal | मिरज लॅबवर या राज्यांचीही जबाबदारी 
sakal

बोलून बातमी शोधा

Miraj Lab has responsibility for Karnataka and Goa along with Maharashtra

मिरज येथील कोरोना प्रयोगशाळेत सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यासह कर्नाटकातील विजापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड तसेच गोवा राज्यातूनही तपासणीसाठी नमुने पाठवण्यात येणार आहेत.

मिरज लॅबवर या राज्यांचीही जबाबदारी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज : येथील कोरोना प्रयोगशाळेच्याकामाची व्याप्ती आता वाढू लागली आहे. या प्रयोगशाळेत सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यासह कर्नाटकातील विजापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड तसेच गोवा राज्यातूनही तपासणीसाठी नमुने पाठवण्यात येणार आहेत. आज या प्रयोगशाळेत कोल्हापुरातील 21 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत अपेक्षित आहेत.


शासकीय रुग्णालयात इंडियन व्हॉयरॉलॉजी डिपार्टमेंटच्या अधिपत्याखाली नव्याने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत सध्या कोरोना जंतुची तपासणी केली जाते. या प्रयोगशाळेमुळे मुंबई आणि पुणे येथील प्रयोगशाळांवरील ताण कमी झाला आहे. तसेच येथील यंत्रणा अत्याधुनिक असल्याने तपासणीचे अहवाल ही केवळ दहा ते बारा तासांत उपलब्ध होणार आहेत. या प्रयोगशाळेत सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. पल्लवी सापळे, डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. प्रकाश धुमाळ, डॉ. विनिता कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली कामकाज होत आहे. दिवसागणिक या प्रयोगशाळेच्या कामाची व्याप्ती यापुढे वाढत जाणार आहे. 

दरम्यान, आज अचानकच कोल्हापूर जिल्ह्यातून 21 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी दाखल झाले. त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही एक नमुना तपासणीसाठी आला. हे सर्व नमुने तातडीने तपासणीसाठी घेण्यात आले. यापूर्वी या प्रयोगशाळेत केवळ सांगली जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी केली जात होती. परंतु आता या प्रयोगशाळेचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने महाराष्ट्रातील पाच जिल्हे, कर्नाटकातील तीन आणि गोवा राज्याचे नमुने या प्रयोगशाळेत तपासणीसाठी येणार आहेत. 

लॅबवरील जबाबदारी (राज्य आणि जिल्हे) 

  • महाराष्ट्र : सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
  • कर्नाटक : विजापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड 
  • गोवा : दक्षिण गोवा, उत्तर गोवा