मिरज पंचायत समिती सभापतीच्या राजीनाम्याच्या हालचाली; महिन्यासाठी उपसभापतींकडे कार्यभार सोपवणार

प्रमोद जेरे
Saturday, 21 November 2020

मिरज  पंचायत समीतीच्या सभापती सुनिता पाटील यांचा राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर सभापतीपदाचा कार्यभार महिन्यासाठी उपसभापती दिलीपकुमार उर्फ बंडु पाटील यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

मिरज (जि. सांगली) :  पंचायत समीतीच्या सभापती सुनिता पाटील यांचा राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर सभापतीपदाचा कार्यभार महिन्यासाठी उपसभापती दिलीपकुमार उर्फ बंडु पाटील यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या तालुकास्तरीय नेत्यांसह खासदार संजय पाटील यांनी विशेष लक्ष घातले आहे. या आदेशास अनुसरुन येत्या काही दिवसांत विद्यमान सभापती सुनिता पाटील या त्यांच्या सभापतीपदाचा राजीनामा देणार आहेत. 

मिरज पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच यावेळी भारतीय जनता पक्षास सत्ता मिळाली. आमदार सुरेश खाडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बरेच परिश्रम घेतले. भारतीय जनता पक्षात असल्याचे भासविणारे अनेक इच्छुक प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सत्तेचा खेळखंडोबा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पण अपक्ष म्हणून निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी आमदार खाडे यांच्यावर दबावही आणला.
आमदार खाडे यांनी हा दबाव झुगारुन भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवायचे कडक धोरण स्विकारले. पंचायत समिती संख्याबळावर ताब्यात घेतली. इतिहासात प्रथमच मिळालेली सत्ता टिकवण्यासाठी नेत्यांना बराच खटाटोप करावा लागत आहे. त्यातच सभापतीपद खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित असल्याने त्यासाठी पात्र सर्व महिला सदस्यांना संधी देण्याचे धोरण नेत्यांना स्विकारावे लागले. 

विद्यमान सभापती आरग गणातून निवडून आलेल्या सुनिता पाटील यांची आठ जून रोजी सभापतीपदी निवड झाली. त्यानंतर काही दिवसांनी उपसभापतीपदी म्हैसाळमधून विजयी झालेले दिलीपकुमार उर्फ बंडु पाटील यांची निवड झाली. त्यापैकी सभापती सुनिता पाटील यांची मुदत संपल्याने पंचायत समीतीचा कारभार पाहणा-या नेत्यांनी सभापती पाटील यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. 

विद्यमान सभापती सुनिता पाटील यांनीही राजीनाम्याची तयारी दर्शवल्याने काही दिवसांत त्या राजीनामा देणार आहेत. त्यानंतर काही दिवसांनी उपसभापती दिलीपकुमार पाटील यांना काही दिवसांसाठी सभापतीपदाचा कार्यभार सोपवण्यात येणार आहे. सुनिता पाटील यांच्या राजीनाम्यानतंर या पदाच्या दावेदार गीताजंली कणसे आणि त्रिशला खवाटे या दोघी आहेत. त्यापैकी एकीची सभापतीपदासाठी निवड करतानाही नेत्यांना खटाटोप करावा लागेल अशी स्थिती आहे.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj Panchayat Samiti Chairman may give his resignation; The charge will be given to the Deputy Speaker for a month