त्या शिक्षण संस्थेत गैरप्रकार; प्राथमिक चौकशीत स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

पेठ (ता वाळवा) परिसरातील एका शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचे वाळवा तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

इस्लामपूर : पेठ (ता वाळवा, जि . सांगली) परिसरातील एका शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचे वाळवा तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. सोमवारी (ता. 6) सहज या शिक्षण संस्थेला भेट दिली असता संबंधित अधिकाऱ्यांना संस्था कामकाज आणि व्यवहारात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत. उपविभागीय अधिकारी पातळीवरून या कामकाजाची चौकशी सुरू असून प्राथमिक अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आल्याचे समजते.

याबाबत माहिती अशी, पेठ परिसरात एक जुनी शिक्षण संस्था कार्यरत आहे. सोमवारी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील एका पथकाने या शाळेला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली असता, अनेक बाबींमध्ये गैरप्रकार असल्याचे दिसून आले. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात, तसेच एकूण कामकाजाच्या नोंदी व व्यवहारांमध्येदेखील त्रुटी आढळल्या आहेत. सविस्तर चौकशी झाल्यास आणखी गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

या संस्थेने केलेले काही करार बोगस आहेत. करार एकाशी आणि पैसे दुसऱ्यालाच दिले आहेत; तर कागदपत्रे, त्यावरील तारखा यातही बरीचशी तफावत आहे. संस्थेने कोणत्याही मान्यतेशिवाय संलग्न अकॅडमी सुरू केली आहे. त्यासाठी वापरले जाणारे विद्यार्थी परस्परच दाखल करून घेतले जातात. दाखल्याच्या रजिस्टरमध्ये असलेल्या नोंदीतही तफावत आहे. संस्थेने गेल्या चार वर्षांचे लेखापरीक्षण केलेले नाही. इतिवृत्त सभा घेतल्या नाहीत. शालेय व्यवस्थापन समिती आणि संस्थाचालक म्हणून जी नियमावली असावी लागते तीच अस्तित्वात नाही, अशा अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत.

या सर्व माहितीचा प्राथमिक अहवाल प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी वरिष्ठांना सादर केला आहे. संस्थेतील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तो दडपून टाकण्यासाठी संबंधित संस्थाचालक व यंत्रणेकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misconduct in that educational institution; Preliminary inquiries clarified