मुश्रीफ म्हणाले, आमचे एक मित्र सातव्यांदा तर दुसरे पहिल्यांदा लढणार...

मुश्रीफ म्हणाले, आमचे एक मित्र सातव्यांदा तर दुसरे पहिल्यांदा लढणार...

कागल - येथील पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारत उद्‌घाटन सोहळ्याच्यानिमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे सर्वजण एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्यात आडपडद्याने झालेली जुगलबंदी उपस्थितांचे मनोरंजन करून गेली.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस, कागलचे आख्खे राजकीय विद्यापीठ एकाच व्यासपीठावर आल्याचा उल्लेख करीत खासदार संजय मंडलिक यांनी, आज राजकीय टोलेबाजी ऐकावयास मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली. 

यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले ""आता निवडणुकीचे रणांगण सुरू होणार आहे. संजयबाबा सातव्यांदा लढणार आहेत. (समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता मुश्रीफ म्हणाले) आमचे एक मित्र आहेत ते पहिल्यांदा लढणार आहेत.

मंत्री पाटील यांचे कौतुक करताना आमदार मुश्रीफ म्हणाले, ""ज्यांना पाच वर्षांत सगळेच मिळाले अशी भाग्यवान व्यक्ती म्हणजे चंद्रकांत पाटील. ते नशीबवान आहेत. ते सहृदयी आहेत. ते राजकारणात कसे आले याचे मला आश्‍चर्य वाटते. त्यांच्या स्वभावात दोन टोके आहेत. एक अतिशय मोठ्या मनाचा आणि एक कोण उलटा गेला तर त्यानंतरचा !. राजकारणात माझे व त्यांचे जरूर मतभेद आहेत. आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत. त्यामुळे टिकाटिपणी होत असते.'' 

मुश्रीफ म्हणाले, ""मी, संजय मंडलिक, संजयबाबा घाटगे, अंबरिषसिंह घाटगे अशी आम्ही मंडळी पंचायतीच्या माध्यमातून पुढे गेलेलो आहोत. अनेक वर्षे संजय घाटगे पंचायत समितीचे सभापती होते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असा अनुभव माणसाला असला की काम करणे सोपे जाते. कायद्यातील माहिती कळते.

अशी कोपरखळी समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता आमदार मुश्रीफ यांनी मारली. समरजितसिंह घाटगे यांनीही स्मितहास्य करून ती कोपरखळी परतावून लावली. 

यावर मंत्री पाटील म्हणाले, "पराधिन आहे जगती पपत्र मानवाचा" हे पूरामुळे राजकीय लोकांच्या लक्षात आले असेल. त्यामुळे निवडणूक, भांडाभांड, मारामार, जिंकणे, हरणे हे सगळे क्षणभंगुर आहे. हातात काही नसते. पूर येतो आणि सारे वाहून नेतो. पूर आला, पाऊस आला तर कोण काय करणार? मी एकटाच वर राहणार आणि बाकीचे सगळे पुरात वाहून जाणार असे कुणाला वाटत असेल तर ते काही नसते. लोकशाही स्वीकारली तर निवडणुका होणारच, कोण जिंकणार, कोण हारणार, कोण विरोधात जाणार. मात्र एकमेकांना बोललेले ओरखडे मनावर उमटलेले राहणार. त्यामुळे मिळालेले आयुष्य सगळ्यांशी प्रेमाने वागण्यात घालविले पाहिजे. असे बोलून उठलेला राजकीय वाद शांत करत अप्रत्यक्षपणे समरजितसिंह घाटगे यांची बाजू घेतली.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com