दुष्काळातही दत्तक गावांकडे आमदारांची पाठ 

तात्या लांडगे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सोलापूर : राज्यातील प्रत्येक आमदारांनी दरवर्षी किमान एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याच्यादृष्टीने सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली. त्यासाठी सरकारकडून 50 हजारांचा स्वतंत्र निधी दिला जातो. परंतु, पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गावांना अद्यापही निधीची प्रतीक्षाच आहे. दुसरीकडे पहिल्या वर्षानंतर आमदारांनी निवडलेल्या गावांचा विकास आराखडाच तयार झालेला नाही. आता ऐन दुष्काळातही आमदारांना दत्तक गावांचा विसर पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

सोलापूर जिल्ह्यात 11 तालुक्‍यातील आमदार व तीन विधानपरिषदेचे आमदार आहेत. या सर्व आमदारांनी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एका ग्रामपंचायतींची निवड केली. त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी आतापर्यंत एकही गाव निवडले नाही. दुसरीकडे आमदार नारायण पाटील, आमदार भारत भालके, आमदार गणपतराव देशमुख, आमदार हणुमंत डोळस व आमदार रामहरी रुपनवर यांनी निवडलेल्या गावांचे अद्यापही विकास आराखडे तयार झालेले नाहीत. तसेच पहिल्या टप्प्यासाठी निवडलेल्या चार्ज अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असूनही त्याठिकाणी अद्यापही नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या झालेल्या नाहीत. दुसरीकडे मोहोळ मतदारसंघाचे आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या घोटाळ्यात अडकल्याने त्यांनी निवडलेली गावे विकासापासून वंचित आहेत. दुसरीकडे आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अन्य आमदारांनी निवडलेली गावे विकासापासून अद्यापही दूरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

सहकारमंत्री अन्‌ पालकमंत्र्यांनाही योजनेचा विसर 
राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी पहिल्या टप्प्यात त्यांच्या मतदारसंघातील यत्नाळ (ता.दक्षिण सोलापूर) ची आमदार आदर्श ग्राम योजनेत निवड केली. त्यानुसार विलंबाने का होईना ग्रामविकास आराखडा सादर करण्यात आला परंतु, गावात म्हणावा तितका विकास झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात त्यांनी येळेगाव व सादेपूर गावांची निवड केली, परंतु, त्या गावांच्या विकासाचा आराखडाच तयार झालेला नाही. दुसरीकडे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पहिल्या टप्प्यात खेड (उत्तर सोलापूर) तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात कोंडी व 248 सोलापूर या गावांची निवड केली. मात्र, या गावांचेही आराखडे मागील दोन वर्षांपासून तयारच झालेले नसून या गावांना विकासाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA ignores adopted villages in drought also