राज्यात सत्तास्थापनेबाबत सुरू हालचालीवर जयंत पाटील म्हणाले,

MLA Jayanat Patil Comment On Maharashtra Politics
MLA Jayanat Patil Comment On Maharashtra Politics
Updated on

इस्लामपूर ( सांगली ) - राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी आश्वासक पावले टाकली जात आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज येथे केले. राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तोकडी असून कर्जमाफीसाठी आम्ही आग्रही राहू, असेही ते म्हणाले.

राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या साखराळे युनिटच्या ५१ व्या बॉयलर अग्निप्रदीपनच्या निमित्ताने ते आज इस्लामपुरात आले होते. यावेळी त्यांनी सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

आताच स्वप्न बघणे योग्य नाही

श्री. पाटील म्हणाले, "कार्यकर्त्यांनी आपले सरकार येणार आहे म्हणून आनंदात राहू नये आणि आले नाही म्हणून दुःखही व्यक्त करू नये. राजकारणात चढ - उतार होत असतात. राज्यात सत्तास्थापनेच्या पातळीवर ज्या हालचाली सुरू आहेत, त्याबाबत आपण आताच स्वप्न बघणे योग्य नाही. आज दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा होईल. त्यानंतर पुढची पावले पडतील. कदाचित उद्या (ता. १९) संध्याकाळी मलाही दिल्लीत जावे लागण्याची शक्यता आहे. तिथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्यासमवेत बैठक होईल, त्यात आणखी दोन पावले पुढे पडतील. कार्यकर्त्यांनी आपल्या मनासारखे झाले नाही म्हणून दुःख करून घेऊ नये पण झाले म्हणून जास्त आनंदही मानू नये. मनासारखे झाले नाही तर आपण सक्षम विरोधक म्हणून चांगले काम करू."

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पर्याय

 "एफआरपी देण्यासाठी गतवर्षी कर्ज काढावे लागले, पण यावेळी बाजारपेठेतुनच दर चांगला मिळाला तर परिस्थिती आटोक्यात येईल. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्यपालांना भेटून पूरग्रस्त, शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्यात. त्यांनी जाहीर केलेली मदत तोकडी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पर्याय आहे, ती करावीच लागेल. द्राक्ष बागायतदार, डाळिंब शेतकरी यांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल."

जयंत पाटील

शेतकरी संघटना ठरवेल त्यानुसार पावले टाकू

ते म्हणाले, "तांत्रिक क्षमता उत्तम असलेला कारखाना आपल्याकडे आहे. कारखानदारी किंवा ऊस उत्पादकांना मुक्तपणाने काही द्यावे असे सरकारला वाटले नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना जे ठरवेल त्यानुसार आपण योग्य ती पावले टाकू. अवकाळी पावसामुळे यावेळी अडचण झालीय, २५ तारखेपर्यंत कारखाने सुरू व्हावेत आणि दराचाही प्रश्न सुटण्याची अपेक्षा आहे. सर्वोदयच्या बाबतीत कायदेशीर प्रश्न निर्माण केले गेले, न्यायालयाच्या स्थगितीमुळे काही अडचणी आहेत, त्यातूनही लवकर मार्ग निघेल. मानसिंग नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे वाकुर्डे योजनेचे पाणी लवकरच पेठेपर्यंत येईल. एकहाती कारखाना चालला आणि शेतकरी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समजूतदारपणामुळे गेल्या पन्नास वर्षात कारखान्याची प्रगती झाली. शेतकऱ्यांशी संवाद महत्त्वाचा आहे, यापुढच्या काळातही तो टिकवला जाईल." कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com