
सरकार आपले आहे, जनतेच्या खूप अपेक्षा आहेत
प्लीज आत्ता ह्या पुढे असा काही करु नका. मी हात जोडुन विनंती करते. आपल्या पक्षाच्या आणि पक्ष श्रेष्ठींचा निर्णय मान्य आहे. पक्ष श्रेष्ठी बद्दल अजुन ही आदर आहे. आणि पुढे देखील रहणार. मी माझ्या सर्व सहकार्याना विनंती एकदा केली आहे. आणि पुन्हा करत आहे प्लीज आत्ता हे सगळ थांबवा. हे आपलं सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या कडुन खुप अपेक्षा आहेत, त्या साठी एकत्र येवुन कामाला लागुयात.
- आमदार प्रणिती शिंदे यांची फेसबूक पोस्ट
सोलापूर ः महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात आमदार प्रणिती शिंदे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारी तर कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे व्यथित झाल्या आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
आधी हे वाचा... सोलापूर युवक काॅंग्रेसचा गनिमी कावा
नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिला पहिल्यांदा राजीनामा
आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील कॉंग्रेसप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र त्याचवेळी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले असून, त्याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात प्रणिती शिंदे यांचा समावेश नक्की असल्याची खात्री सर्वांनाच होती. मात्र त्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे सर्वांचाच अपेक्षाभंग झाला. नगरसेविका फिरदोस पटेल यांनी याचा निषेध म्हणून सर्वात आधी नगरसेवकपदाचा शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला, त्यानंतर इतर पदाधिकार्यांनीही राजीनामे दिले.
हेही वाचा... मंत्रीपद न मिळाल्यास नेत्यांचे पुतळे जाळणार
......आणि आंदोलन पेटले
जो पर्यंत प्रणिती शिंदे यांचा समावेश मंत्रीमंडळात होत नाही, तोपर्यंत प्रदेश कॉंग्रेस समितीने सूचना केलेल्या एकाही कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची नाही, प्रसंगी कॉंग्रेस भवन बंद ठेवू असा इशाराही देण्यात आला. प्रणितींना डावलल्याबद्दल प्रदेश कॉंग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. शिंदे यांचा समावेश न होण्यामागे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचा हात असल्याने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही झाली.
सर्वात आधी हे वाचा... राजीनामे काय देताय, मुंबईला जाऊ
दिखाऊगिरी सुरु असल्याची टिका
राजीनामे द्यावेत की नाही याबाबत दोन मतप्रवाह होते. राजीनामे दिल्यास पक्ष अडचणीत येईल, त्यापेक्षा पदाधिकाऱ्यांना भेटू, प्रसंगी दिल्ली गाठू आणि श्रेष्ठींमार्फत मंत्रीपद आणू असे काहीजणांचे मत होते. राजीनामे दिल्याशिवाय श्रेष्ठी दखल घेणार नाहीत, त्यामुळे शहराध्यक्ष, महिला आघाडी पदाधिकारी व नगरसेवकांनीही त्यांचे राजीनामे द्यावेत. नगरसेवकांनी शहराध्यक्षांकडे न देता ते महापालिका आयुक्तांकडे द्यावेत, अशीही मागणी पुढे आली. स्थानिक पातळीवर दिखाऊगिरी करण्याची धडपड सुरु असल्याची टीका सुरु झाली, त्यातच श्री. खर्गे यांचा पुतळा जाळल्याबद्दल कॉंग्रेसच्या सर्वस्तरावर नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर आमदार शिंदे यांनीच याबाबत पुढाका घेत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.