सतेज पाटील म्हणतात, गनिमी काव्यानेच काम करणार...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे मोगलांना पाण्यात दिसायचे. त्याप्रमाणे विरोधकांना मी सतत पाण्यात दिसतोय. त्यामुळे यापुढे गनिमी काव्यानेच काम करणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.

कोल्हापूर - सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे मोगलांना पाण्यात दिसायचे. त्याप्रमाणे विरोधकांना मी सतत पाण्यात दिसतोय. त्यामुळे यापुढे गनिमी काव्यानेच काम करणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.

रंकाळा इराणी खाणीजवळ राधानगरी रोडवर उभारलेल्या ‘सरसेनापती संताजी घोरपडे स्तंभ’ चौकाच्या मंगळवारी झालेल्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. महापौर माधवी गवंडी, उपमहापौर भूपाल शेटे, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, सरसेनापती उदयसिंह घोरपडे यांच्या उपस्थितीत सरसेनापती स्तंभाचे लोकार्पण झाले.

आमदार पाटील म्हणाले, छत्रपती शिवराय आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराच्या मार्गानेच काम व्हायला हवे. सत्याचा विजय निश्‍चित होतो.

स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी स्मृतिस्तंभाच्या नूतनीकरणाचे केलेले काम कौतुकास्पद आहे.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, संताजी घोरपडे यांच्यासारखा पराक्रमी सरसेनापती मराठा साम्राज्यात पुन्हा झाला नाही. त्यांचे स्मारक स्फूर्ती देणारे आहे.

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, इतिहासात गनिमी कावा विकसित करण्याचे काम सरसेनापती संताजी घोरपडे यांनी केले. औरंगजेबाच्या मनात दहशत निर्माण करणारा व शत्रूकडूनही मोठा गौरव प्राप्त झालेला हा इतिहासातील शेवटचा सेनानी झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर छत्रपती घराण्याशी इनाम कायम राखत त्यांनी मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले.

शारंगधर देशमुख , उदयसिंह घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी नगरसेविका वनिता देठे, दीपा मगदूम, अभिजित चव्हाण, अर्जुन माने, वसंतराव देशमुख, अमोल बिडकर, सचिन कोकाटे, संजय मोरे आदी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Satej Patil comment