मिरजेचे आमदार सुरेश खाडे कोरोना बाधित, कुटुंबातील सहाजणांनाही बाधा 

अजित झळके
Thursday, 13 August 2020

भाजपचे मिरज विधानसभा मतदार संघाचे आमदार, माजी सामाजिक न्याययमंत्री सुरेश खाडे यांच्यासह कुटुंबातील सहाजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरज ः भाजपचे मिरज विधानसभा मतदार संघाचे आमदार, माजी सामाजिक न्याययमंत्री सुरेश खाडे यांच्यासह कुटुंबातील सहाजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते मिरज येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. आपली प्रकृती ठणठणीत आहे, कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत, समर्थकांना चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी "सकाळ'च्या माध्यमातून केले आहे.

 
कोरोना संकट काळात पहिल्या टप्प्यात सुरेश खाडे यांनी आपल्या मूळ गावी पेड (ता. तासगाव) येथे राहणे पसंत केले होते, मात्र लॉकडाऊन दीर्घकाळ वाढत गेला. लोकांवर संकट आले. कार्यकर्ते अस्वस्थ व्हायला लागले. त्यानंतर त्यांनी मैदानात उतरून लोकांना आधार द्यायला सुरवात केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी नाहक कन्टेंमेंट झोन लावल्याबद्दल महापालिकेच्या यंत्रणेची खरडपट्टी केली होती. जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकांना हजेरी लावून त्यांनी लोकभावना प्रशासनापर्यंत पोहचवल्या होत्या. त्यांच्या कुटुंबातील काहीजण व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असायचे. बहुदा त्यामुळे कोरोनाची बाधा झाली असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

आमदार खाडे यांचे स्वीय सहायक आणि त्यांचे बॉडी गार्ड यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ते दोघेही निगेटिव्ह आले आहेत, मात्र त्यांना घरातच थांबण्याची सूचना देण्यात आली आहे.

 

""काही चिंता करण्याचे कारण नाही. माझी व कुटुंबियांची प्रकृती उत्तम आहे. डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली असावे म्हणून रुग्णालयात दाखल झालो आहोत. कार्यकर्ते, समर्थक साऱ्यांनी आपापली काळजी घ्यावी. सुरक्षित रहावे.'' 

आमदार सुरेश खाडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Suresh Khade affected Corona, also affected six members of the family