esakal | इचलकरंजीतील तेलनाडे बंधुंच्या टोळीला डबल मोका
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीतील तेलनाडे बंधुंच्या टोळीला डबल मोका

इचलकरंजीतील तेलनाडे बंधुंच्या टोळीला डबल मोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - येथील नगरसेवक संजय तेलनाडे व सुनिल तेलनाडे बंधूंच्या "एसटी सरकार" टोळीला डबल मोका लावण्यात आला आहे. उद्योजक नितीन लायकर हल्ला प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील तेलनाडे बंधूंसह सातजणांनावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यातील पाचजण सध्या कारागृहात आहेत. 

शिवाजीनगर पोलिसांनी मोका कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके यांच्याकडे पाठविला होता. त्याला श्री. वारके यांनी मंजुरी दिली. याबाबतचा तपास पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्याकडे देण्यात आला आहे. 

तेलनाडे बंधूवर यापूर्वी शहापूर, गावभाग व शिवाजीनगर पोलिसांत खंडणी, बलात्कारसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या तेलनाडे बंधू फरारी आहेत. त्यांचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. मात्र त्यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. यापूर्वी शहापूर पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, उद्योजक नितीन लायकर यांच्यावर 14 जुलै रोजी घरात घुसून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी तेलनाडे बंधूंसह सातजणांवर गुन्हा नोंद केला होता. यातील पाचजणांना अटक केली आहे. यामध्ये अक्षय राजेंद्र नेमिष्टे, सुंदर रमेश नेमिष्टे, राजू उर्फ राजेंद्र गजानन आरगे, अजिंक्‍य जामदार, गणेश बजरंग नेमिष्टे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर जबरी चोरीसह विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.

या सर्वांवर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक ईश्‍वर ओमासे यांनी अपर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे तेलनाडे बंधूवर डबल मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एकूण सातजणांवर मोका अंतर्गत सातजणांवर कारवाई झाली असून पाचजण सध्या कारागृहात आहे. तर तेलनाडे बंधू अद्यापही फरारी असून त्यांचा विविध पथकांकडून शोध सुरु आहे. 
.
तिसऱ्या टोळीवर डबल मोका
शहरात आतापर्यंत अनेक टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. यातील जर्मनी टोळी, उम्याभाई टोळी आणि आता तेलनाडे टोळीवर डबल मोका अंतर्गत कारवाई झाली आहे.

चारही रिट याचिका फेटाळल्या 
शहापूर पोलीस ठाण्याकडील मोका व गावभाग पोलीस ठाण्याकडील सामुहिक बलात्कारच्या गुन्ह्यात तेलनाडे बंधूंनी दोन रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. त्याच प्रमाणे या प्रकरणातील आणखी एक संशयीत ऍड.पवन उपाध्ये यांनीही दोन स्वतंत्र रिट याचिका दाखल केल्या होत्या. चारही रिट याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. दोन्ही गुन्ह्यातील "एफआयआर" रद्द करण्याची मागणी रिट याचिकेत करण्यात आली होती. 

जिल्ह्यात 226 जणांवर कारवाई
आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात मोका अंतर्गत 226 जणांवर कारावाई करण्यात आली आहे. यामध्ये सन 2018 मध्ये 18 तर सन 2019 मध्ये आतापर्यंत 11 टोळ्यांवर मोका लावण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाढत्या गुन्हेगारीला मोठा पायबंद बसला आहे. 

loading image
go to top