#worldfamilyday मोल्ड फॉर इच आदर सूत्रच करेल कुटुंब सुखी...

भूषण पाटील
बुधवार, 15 मे 2019

अनेकदा पतीपत्नींत वादाचे कारण किरकोळ असते; मात्र त्यांच्या अहंकारी स्वभावामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत येते. कौटुंबिक न्यायालयात पती-पत्नी आणि त्याच्या कुटुंबांत समेट घडवून आणायला प्राधान्य आहे. येणाऱ्या बहुतांशी तक्रारी यशस्वीपणे सोडवल्या आहेत. याव्यतिरिक्त शाळा, महाविद्यालयांत विवाहपूर्व मार्गदर्शनही करत आहोत. पत्नी-पत्नींनी मेड फॉर इच आदर नव्हे; तर मोड फॉर इच आदर ही भूमिका घेतल्यास या वादांचे प्रमाण निश्‍चित कमी होईल.
- स्मिता जोशी
, समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय.

कोल्हापूर - उच्चशिक्षण, त्यामुळे आलेले स्वावलंबन आणि संयमाचा अभाव यांमुळे पती-पत्नी आणि पर्यायाने कुटुंबातील नात्यांची वीण सुटत आहे. क्षुल्लक कारणातून प्रकरणे कौटुंबिक न्यायालयापर्यंत येतात. विशेष म्हणजे प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांचे प्रमाण यात अधिक आहे. कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक व समाजातील सेवाभावी संस्था असे तुटत चाललेले संसार पुन्हा जुळविण्यात मोलाचा वाटा उचलत आहेत; पण दिवसेंदिवस वाढत जाणारे हे प्रमाण चिंता वाढविणारे आहे. 

या दोघांचे महाविद्यालयात प्रेम झाले व सहा महिन्यांत त्यांनी प्रेमविवाहाने संसार थाटला. दोघांच्या घरच्यांनी नाइलाजाने 
दोघांना स्वीकारले. लग्नानंतर चार महिन्यांत मोबाईलवर रिचार्ज मारण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि हे प्रकरण त्यांनी कौटुंबिक न्यायालयापर्यंत आणले. 

शिक्षणाच्या निमिताने परदेशांत असलेल्या या दोघांची तब्बल सात वर्षे मैत्री. सर्वांच्या परवानगीने त्यांनी लग्न केले. मात्र, सात महिन्यांत दोघांच्या एकमेकांबद्दल अपेक्षा वाढल्या आणि वाद होऊन प्रकरण कौटुंबिक न्यायालयापर्यंत आले. 

पती-पत्नींत नात्याला किती सहजतेने घेतले जात आहे, याची ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पती-पत्नी आणि त्यांच्याशी संबंधित नातेवाइकांच्या वादाची रोज नवी उदाहरणे कौटुंबिक न्यायालयासमोर येतात. कोल्हापूर येथील कौटुंबिक न्यायालयात महिन्याला अशी जवळपास २० प्रकरणे येत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ही आकडेवारी आहे. यातही प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांचे प्रमाण अधिक आहे. लग्न आणि काही वेळ भेटणाऱ्या जोडीदारासोबत नेहमी राहणे, दोघांसाठीही अडचणीचे ठरत आहे.

तर ॲरेंज मॅरेजमध्ये लग्न व लग्नानंतरचा मानपानच कळीचा मुद्दा ठरत आहे. अशा जोडप्यांचे, त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांचा संसार पुन्हा रुळावर आणण्यासाठी समुपदेशक, वकील, न्यायाधीशांबरोबरच जिल्ह्यातील ३३ सामाजिक संस्था धडपडत आहेत. कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे, या प्रामाणिक भावनेतून वेगवेगळ्या स्तरावर ही मंडळी प्रबोधनाचे काम करत आहेत.

वर्षाला जवळपास ७०० तक्रारी कौटुंबिक न्यायालयात दाखल होतात. पती- पत्नी, नातेवाइकांत चर्चेच्या फेऱ्या घडवून यांतील निम्याहून अधिक प्रकरणांत समेट घडवून आणण्यात कौटुंबिक न्यायालये यशस्वी झाली आहेत; मात्र दरवर्षी वाढणारे हे दाखल तक्रारींचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे.

समुपदेशनाच्या मदतीसाठी संपर्क साधा 

  •  मनस्पंदन फाउंडेशन- खरी कॉर्नर 
  •  वुई केअर सोशल फाउंडेशन- सोमवार पेठ 
  •  आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्था- गांधी मैदान, शिवाजी पेठ 
  •  अस्मिता महिला विकास मंडळ- कोल्हापूर 
  •  क्रांतिज्योती सामाजिक, शैक्षणिक बहु. संस्था- कदमवाडी

वादाची ही आहेत कारणे 

  •  उच्चशिक्षणामुळे आलेले स्वावलंबन 
  •  नातेवाइकांचा अतिरेकी हस्तक्षेप  संयमाचा अभाव
  •  सोशल मीडियाचा प्रभाव  एकत्र कुटुंबपद्धती

अनेकदा पतीपत्नींत वादाचे कारण किरकोळ असते; मात्र त्यांच्या अहंकारी स्वभावामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत येते. कौटुंबिक न्यायालयात पती-पत्नी आणि त्याच्या कुटुंबांत समेट घडवून आणायला प्राधान्य आहे. येणाऱ्या बहुतांशी तक्रारी यशस्वीपणे सोडवल्या आहेत. याव्यतिरिक्त शाळा, महाविद्यालयांत विवाहपूर्व मार्गदर्शनही करत आहोत. पत्नी-पत्नींनी मेड फॉर इच आदर नव्हे; तर मोड फॉर इच आदर ही भूमिका घेतल्यास या वादांचे प्रमाण निश्‍चित कमी होईल.
- स्मिता जोशी
, समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय.

असे टाळता येतील वाद 
*एकमेकांना गृहीत न धरता निर्णय घेणे 
*कामाच्या व्यापातून वेळ काढत जोडीदार व कुटुंबीयांशी सुसंवाद 
*क्षणिक अहंकार बाजूला करून भविष्याचा विचार 
*आदर्श कुटुंबाला साजेसे वर्तन 
*वादाच्या काळात मित्रांचा सल्ला टाळणे 

Web Title: Mold for each other concept made family happy