जिल्ह्यात दिवसाला सातशेहून अधिक चाचण्या

बलराज पवार 
Thursday, 3 September 2020

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सर्व यंत्रणा युध्दपातळीवर राबत असताना कोरोनाचे अहवाल येण्यास मात्र उशीर लागत असल्याने परिस्थिती बिकट आहे. अहवाल लवकर येण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

सांगली : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सर्व यंत्रणा युध्दपातळीवर राबत असताना कोरोनाचे अहवाल येण्यास मात्र उशीर लागत असल्याने परिस्थिती बिकट आहे. अहवाल लवकर येण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल चार ते पाच दिवस लागत आहेत. जिल्ह्यात सध्या दिवसाला सातशेहून अधिक चाचण्या होत आहेत. मात्र केवळ तीनच आरटीपीसीआर मशिन्स असल्याने चाचण्यांना उशीर होत आहे. ही मशिन्स वाढवण्याची गरज आहे. 

शहर आणि जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला सातशेहून अधिक होत आहे. त्यांच्या संपर्कातील सुमारे 15 जण गृहीत धरुन त्यांचीही स्वॅब तपासणी केली जाते. त्यामुळे ही संख्या वेगाने वाढत आहे. त्यांच्या चाचण्या करण्याएवढी क्षमता उपलब्ध नसल्याने अहवाल येण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल येईपर्यंत तो होम क्वारंटाईन होण्याची गरज आहे. मात्र तसे होत नसल्याने बाधित रुग्ण बाहेरच फिरत असतो आणि संसर्ग पसरवत असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

जिल्ह्यात मार्च महिन्यात थ्रोट स्वॅब नमुने तपासण्याची सोय नव्हती. त्यामुळे स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्याला राष्ट्रीय विषाणु संस्थेकडे पाठवण्यात येत होते. त्यानंतर एप्रिलमध्ये मिरज कोविड हॉस्पीटल येथे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरु करण्यात आली. याच प्रयोगशाळेत सध्या तीन मशिनद्वारे जिल्ह्यातील थ्रोट स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. त्याची तपासणी क्षमता प्रति दिन 150 चाचण्यांवरुन सातशे चाचण्यांपर्यंत वाढवली आहे. तसेच मेट्रोपॉलिस खाजगी लॅब आणि पुण्यातील किस्ना खाजगी लॅब यांच्या मार्फतही आर.टी.पी.सी.आर. चाचण्या करण्यात येत आहेत. पण त्यांचे अहवाल बाहेरुन येतात. त्याचा अहवाल येण्यासही चार दिवसांचा कालावधी जातो. 

शासनाच्या पोर्टलवर रिपोर्ट देणे महत्वाचे 
एका पॅथॉलॉजी लॅबच्या डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल सर्वात आधी शासनाच्या पोर्टलवर द्यावा लागतो. मात्र बऱ्याचवेळा सर्व्हर डाऊन असतो किंवा यंत्रणा स्लो झालेली असते. त्यामुळे अहवाल टाकण्यास उशीर होतो. त्यानंतर तो रुग्णास कळवावा लागतो. 

खासगी लॅबना चाचणीस परवानगी 
कोविड-19 पॉझिटीव्ह रूग्णांचे निदान जलदगतीने होण्यासाठी मिरज कोविड रूग्णालय, सिव्हील हॉस्पीटल सांगली व महापालिका क्षेत्रामध्ये तसेच जिल्ह्यात ऍन्टिजन चाचणी वापर सुरू करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील व शहरातील 13 खाजगी हॉस्पिटल्स आणि 14 खाजगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळांनासुध्दा ऍन्टिजन चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अँटीजेन चाचणी करण्यास खासगी पॅथॉलॉजी लॅबना परवानगी दिली आहे. त्याचे अहवाल येण्यास दोन ते तीन तास लागतात. 

एचआरटीसीसी चाचणीही सुरु 
सध्या शहरात फुफ्फुसाचे सीटी स्कॅनिंग करुन एचआरटीसीसी चाचणी करण्यात येत आहे. ही चाचणी महागडी आहे. पण त्याचा अहवाल अर्धा ते एक तासात येतो. सध्या शहरातील एका खासगी लॅबमध्ये ही चाचणी होत असून तेथेही दिवसाला सुमारे शंभर चाचण्या केल्या जात आहेत. 

दृष्टिक्षेप
* जिल्ह्यात 31 ऑगस्टअखेर आर.टी.पी.सी.आर. व ऍन्टिजन टेस्ट अशा एकूण 80 हजार 457 टेस्ट्‌स. 
* एकूण 13 हजार 167 (रिपीट टेस्टसह) पॉझिटीव्ह अहवाल आले. 
* सध्या तीनच आरटीपीसीआर मशिन्सद्वारे चाचण्या सुरु 
* आणखी मशिन्स वाढवण्याची गरज 
* आरटीपीसीआर मशिन्स महागडी असल्याने खासगी लॅबना परवडत नाही 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than seven hundred tests a day in the district