
Eye Donation: वर्षभरात दोनशेहून अधिक जणांना मिळाली ‘दृष्टी’; नेत्रदान संकल्पातून मृत्युनंतर अनेकांचे नेत्रदान
Kolhapur News : एखाद्या आघाताने आलेल्या अंधत्वामुळे संपूर्ण जीवनच अंधकारमय झालेल्यांना नेत्रदान चळवळ ही जगण्याची एक आशा बनली आहे. कोल्हापूरातील नेत्रपेढीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात झालेल्या नेत्रदानामुळे सुमारे दोनशेहून अधिकजणांच्या जीवनातील अंध:कार दूर झाला आहे.
कोरोनामध्ये नेत्रदान चळचळ थोडी थंडावली होती. पुन्हा गेल्या वर्षभरात मृत्युनंतर नेत्रदानाचे प्रमाण वाढले असून २०२२ - २३ मध्ये १६५ जणांनी तर मार्चपासून आजपर्यंत ४० जणांनी नेत्रदान केले आहे. तर आजपर्यंत गेल्या वर्षभरात चारशेहून अधिक जणांनी नेत्रदानाचा अर्ज भरून नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली आहे.
अचानक झालेल्या अपघातामुळे, तर जन्मत: किंवा आजाराने आलेल्या अंधत्वामुळे अनेकांना दृष्टिहीन जीवन जगावे लागते. मात्र समाजातून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नेत्रदान चळवळ जोमाने काम करत आहे. या चळवळीमुळे नेत्रपेढींच्या माध्यमातून दोनशेहून अधिक जणांना दृष्टी मिळाली आहे.
नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज गैरसमज आहेत. त्यामुळे नेत्रदान, नेत्रपेढी, तिचे कार्य याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे आव्हान नेत्रपेढींसमोर आहे. चेहरा विद्रुप होत असल्याचा सर्वात मोठा गैरसमज सध्या लोकांमध्ये आहे. (Latest Marathi News)
नेत्र प्रत्यारोपणमध्ये आधुनिक तंत्रज्ञानात फक्त डोळ्यांच्या बुबुळांचे प्रत्यारोपण केले जाते. त्यामुळे चेहरा विद्रुपीकरणाचा प्रश्नच येत नाही. याबाबत लोकांमधील गैरसमज दूर करून रूग्णाच्या मृत्युनंतर नेत्रदान करण्याबाबत नातेवाईकांचे समुपदेशन केले जाते.
बहुंताश वेळा जवळच्या नातेवाईकांचे समुपदेशन केल्यानंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. नेत्रदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तीचा घरी मृत्यु झाल्यास काही बाबींची विशेष काळजी घ्यावी लागते.
ज्यामध्ये सहा तासांच्या आत नेत्रप्रत्यारोपण होणे गरजेचे आहे. तसेच फॅन बंद करून रूग्णाच्या सभोवतालची हवा खेळती ठेवली पाहिजे. डोळे झाकलेले असावेत, यासंदर्भात नातेवाईकांनाही नेत्रदानाची माहिती नेत्रपेढ्यांच्या माध्यमातून दिली जाते.(Marathi Tajya Batmya)
नेत्रदान करताना
१ वर्षांवरील व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकते.
त्यासाठी व्यक्तीने जिवंतपणी नेत्रदानाची लेखी इच्छा व्यक्त करणे गरजेचे आहे.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ तासांच्या कालावधीत नेत्रदान होणे गरजेचे आहे.
तेव्हा व्यक्तीच्या नातेवाईकांनी तात्काळ नेत्रपेढीत संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळवले पाहिजे.
त्यानंतर दृष्टीहिनांना मागणीनुसार या नेत्रपेढीतून नेत्रदान करण्यात येते.
विशेष म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वापरत असलेल्या व्यक्तीही नेत्रदानास पात्र ठरतात.
कुत्रा चावल्यास, कर्करोगबाधित तसेच एचआयव्ही बाधितांना नेत्रदान करता येत नाही.
या आहेत नेत्रपिढ्या
- सीपीआर नेत्रपेढी
- ज्ञानशांती नेत्रपेढी (डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल)
- प्रगती नेत्रपेढी
- ॲस्टर आधार नेत्रपेढी
- आदित्य नेत्रपेढी, इचलकरंजी
- अंकुर नेत्रपेढी, गडहिंग्लज
मृत्यूनंतर नेत्रदान होत असल्याने, आपल्या मृत्यूनंतर अंधाला नेत्रदान करून आपण त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणू शकतो. अंध व्यक्तीला नेत्रदान केल्यास त्याच्या माध्यमातून पुन्हा नव्याने जग पाहता येऊ शकते, याचे प्रबोधन करत नेत्रदान चळवळीची व्याप्ती वाढविली जात आहे.
- जॉन लोखंडे, समुपदेशक, सीपीआर नेत्रपेढी