काय जबरदस्त हाय... हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा दरवाजा!' 

परशुराम कोकणे
सोमवार, 8 एप्रिल 2019

सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते. निमित्त होते, "सकाळ'ने आरोग्य दिनानिमित्त रविवारी भुईकोट किल्ल्यात आयोजित केलेल्या मॉर्निंग वॉकचे. 

सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते. निमित्त होते, "सकाळ'ने आरोग्य दिनानिमित्त रविवारी भुईकोट किल्ल्यात आयोजित केलेल्या मॉर्निंग वॉकचे. 

ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासक, इंटॅकच्या समन्वयक सीमंतिनी चाफळकर यांनी भुईकोट किल्ल्याविषयी माहिती सांगितली. आरोग्यासाठी चालणं किती आवश्‍यक आहे, या विषयावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर यांनी मार्गदर्शन केले. एरव्ही बागेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्या अनेकांना किल्ल्याचा खराखुरा हत्ती दरवाजा माहितीच नव्हता. हत्तीच्या धडकेनेही न उघडणारे किल्ल्याचे प्रवेशद्वार पाहून लहानांसह मोठेही थक्क झाले. पर्शियन भाषेतील शिलालेख, दुर्गशिल्पही साऱ्यांनी पाहिले. महांकाळेश्‍वर मंदिर, मुघल शैलीतील कमानी पाहिल्यानंतर साऱ्यांनी सिद्धेश्‍वरांनी स्थापन केलेल्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराचे दर्शन घेतले.

मंदिराची स्थापत्यशैली पाहून सारेच भारावून गेले. नैसर्गिक वातानुकूलित व्यवस्था असलेल्या 32 खांबी वास्तूमधील थंड हवाही अनुभवली. पद्मावती विहिरीची गोष्ट आकर्षण ठरली. 

"सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी प्रास्ताविक केले. मुख्य उपसंपादक संजय पाठक यांनी आभार मानले. बातमीदार परशुराम कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमात डॉ. शालिनी ओक, डॉ. अनिकेत देशपांडे, डॉ. संजय मंठाळे, महेंद्र होमकर, प्रा. दीपक नारायणकर, अण्णासाहेब कोतली, गिरीश चक्रपाणी, डॉ. अरुंधती हराळकर, दीपक गायकवाड, सनी वाघमारे, गीता होमकर, तृप्ती पुजारी, ऍड. लक्ष्मण मारडकर, राहुल बिराजदार, जगदीश पाटील, श्‍याम माढेकर, चिदानंद मुस्तारे, मंदाकिनी माशाळकर, अपर्णा पाटील, संजय वाळवेकर, अरुंधती शेटे, अनिल जोशी, डॉ. राहुल खंडाळ, ललित मगदूम, डॉ. सुरेश बाकळे, सुवर्णलता बाकळे, संतोष धाकपाडे, संदीप कुलकर्णी, ज्योती जाधव, संतोष जाधव, दीपक रणशूर, स्नेहा वाडकर, अविनाश पतकी, मेजर मधुकर माने, अशोक घटकांबळे, आदित्य जाधव यांच्यासह शेकडो सोलापूरकरांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. 

जागतिक आरोग्य दिनी "सकाळ'ने आगळावेगळा उपक्रम राबविला. आरोग्य उत्तम राहण्यासाठी सकस आहार, व्यायाम, सकारात्मक विचार महत्त्वाचे आहेत. चालण्याने खूप चांगला व्यायाम होता, यावर कोणताही खर्चही होत नाही. चालण्याने माणूस उत्साही राहतो. 
- डॉ. ज्योती चिडगुपकर, 
अध्यक्षा, इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूर 

भुईकोट किल्ल्यात "सकाळ'ने वॉकिंगचा उपक्रम आयोजित केल्याने अनेकांनी पहिल्यांदाच किल्ला पाहिला. बहामनी राज्यात हा किल्ला बांधला गेला. किल्ल्याला तिहेरी तटबंदी आहे. कपिलसिद्ध मंदिरासह अनेक वास्तू, शिल्प पाहण्यासारख्या आहेत. 
- सीमंतिनी चाफळकर, 
समन्वयक, इंटॅक 

"सकाळ'ने आयोजित केलेल्या उपक्रमात भुईकोट किल्ल्याविषयी चांगली माहिती मिळाली. ज्येष्ठांसह लहान मुलेही उत्साहाने सहभागी झाली होती. सोलापूरचा इतिहास यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना समजला. 
- सुवर्णलता बाकळे, 
ज्येष्ठ नागरिक 

आम्ही अनेकदा या परिसरात आलो, पण प्रत्यक्षात किल्ला पाहता आला नव्हता. आज "सकाळ'च्या उपक्रमात इंटॅकच्या समन्वयक सीमंतिनी चाफळकर यांच्याकडून किल्ल्याची खूप सारी माहिती मिळाली. भुईकोट किल्ल्याचे संवर्धन व्हायला हवे. 
- ज्योती जाधव, 
गृहिणी 

सोलापुरात मी 40 वर्षांपासून राहत आहे, पण पहिल्यांदाच "सकाळ'च्या उपक्रमामुळे भुईकोट किल्ला पाहता आला. आरोग्य दिनाच्या निमित्ताने छान उपक्रम राबविला आहे. असे उपक्रम सातत्याने व्हावेत. 
- ललित मगदूम, 
सी.ए. 

सोलापूरची ओळख असलेला भुईकोट किल्ला "सकाळ'मुळे पाहता आला. इतिहास जाणून घेताना सर्वांनी वॉकिंग करून आरोग्य दिनही साजरा केला. या किल्ल्याचे संवर्धन व्हायला हवे. पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न व्हावेत. 
- स्नेहा वाडकर, 
नागपूर 

आई-वडिलांसोबत भुईकोट किल्ल्यात भटकंती करून छान वाटले. सर्वांसोबत चालून किल्ल्याचा इतिहास माहिती करून घेतला. विद्यार्थ्यांकरिता असे उपक्रम सातत्याने व्हावेत. किल्ल्याचा इतिहास सर्वांना माहिती व्हायला हवा. 
- आदित्य जाधव, 
विद्यार्थी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning walk at fort in solapur by Sakal