
प्रदीर्घ विश्रांतीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने आता कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेससह कोल्हापूर ते धनबाद आणि कोल्हापूर ते अहमदाबाद या तीन प्रमुख गाड्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मिरज (जि. सांगली) : प्रदीर्घ विश्रांतीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने आता कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेससह कोल्हापूर ते धनबाद आणि कोल्हापूर ते अहमदाबाद या तीन प्रमुख गाड्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाचे मुख्य सरव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी रेल्वे मंत्रालयास पाठवला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या तिन्ही गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली रेल्वेसेवा आता पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी डब्यांची जुळवाजुळव आणि प्रशासकीय पातळीवरील सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत. एकूण 24 गाड्या सुरू करण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
यामध्ये बहुसंख्य गाड्या मुंबईहून विदर्भ मराठवाड्यासह पुण्याहून कर्नाटकात तसेच विदर्भ मराठवाड्यातही सोडण्यात येणार आहेत. यापैकी केवळ तीन गाड्या पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला आल्या. यामध्ये मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई ही महालक्ष्मी एक्सप्रेस आणि धनबाद, अहमदाबाद या दोन गाड्या साप्ताहिक स्वरूपात सोडण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.
सद्य:स्थितीला कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस ही गाडी सोडण्याबाबत व्यापारी आणि उद्योजकांकडून रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे ही गाडी सोडण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावात तिचा उल्लेख केलेला आहे.
याशिवाय धनबाद आणि अहमदाबाद या दोन गाड्या सोडण्यासाठीही गुजरात आणि उत्तर प्रदेशातील राजकीय दबावाचा मध्य रेल्वेने प्रशासनाने विचार केला आहे. एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील खासदारांनी योग्य पाठपुरावा केला नसल्याने कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी शिवाय अन्य कोणत्याही गाड्यांबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
एकीकडे कर्नाटकात चाकरमान्यांसाठीच्या सर्व स्थानिक पॅसेंजर गाड्या नियमितपणे धावत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र चाकरमान्यांसाठीच्या गाड्या सोडण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासन प्रचंड उदासीन असल्याचे चित्र आहे. यासाठीचा पाठपुरावा करण्यात किंबहुना त्यासाठी एकत्र येण्याबाबतही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होत नसल्याची खंत रेल्वे प्रवासी संघटना व्यक्त करीत आहेत.
संपादन : युवराज यादव