खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात त्यांनी सर्वप्रथम मुख्यंमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात खासदार संभाजीराजे म्हणतात,  महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठे स्थान आहे हे आपणास माहीतच आहे.

कोल्हापूर - मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' फक्त शिवाजी असा उल्लेख असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करण्यात यावे, अशी सुद्धा मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. 

मागणीच्या पत्राचे ट्विट त्यांनी केले असून यात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर असे करावे, असेही खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा - लय भारी ! छंद असावा तर असा; चाैथ्या पिढीलाही तोच नाद 
 

मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले पत्र असे

मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात त्यांनी सर्वप्रथम मुख्यंमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात खासदार संभाजीराजे म्हणतात,  महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठे स्थान आहे हे आपणास माहीतच आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरून मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो की केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांचं. त्या दोन्ही वेळी शिवभक्तांची बाजू घेत जाब विचारला होता. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्यक आहे. यासाठी सुरूवात म्हणून सर्व सार्वजनिक स्थळांचे नामविस्तार करणे आवश्यक आहे, ज्यांचे नाव केवळ 'शिवाजी' असे आहे. त्याचा नामविस्तार करण्यात यावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. 

हेही वाचा - आमचं ठरलयं ! गावाचा विकास असा करायचा; कसा ते जरूर वाचा 
 

मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

मराठा आरक्षणाकरिता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून लढली. त्यात अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक आंदोलकांवर विनाकारण गुन्हे नोंदवले गेले आहेत, हे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणीही खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात संभाजीराजे यांनी यापूर्वी माजी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून चर्चा केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhaji Raje Demand To CM Uddhav Thackeray