खासदार मंडलिक म्हणाले, माझी अवस्था कल्हईच्या भांड्यासारखी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

जिल्हा बॅंकेचे संचालक असलेल्या व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या आमदारांचा सत्कार प्रा. मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला.

कोल्हापूर - माझी अवस्था ही कल्हईच्या भांड्यासारखी झाली आहे, त्यामुळेच कोणही येतंय आणि ठोका मारून जातय. मलाही उत्तरे देऊन कंटाळा आलाय असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नांव न घेता लगावत खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी युतीचा जो पराभव झाला तो खासदार आणि शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख म्हणून मी स्विकारली असल्याचे सांगितले. 

जिल्हा बॅंकेचे संचालक असलेल्या व विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या आमदारांचा सत्कार प्रा. मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

ते म्हणाले,"जुन्या काळात जे आमदार, खासदार आहेत ते बॅंकेचे संचालक असायचे पण बॅंकेच्या इतिहासात संचालक झालेले नंतर आमदार, खासदार झाले ही घटना पहिल्यांदाच घडली. जिल्ह्यात आम्ही एकावर आलो पण राज्यात आम्ही सत्तेत आलो आहे. माणसांचे प्रश्‍न सोडवले जावेत ही भुमिका मतदारांनी घेतली आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून जिल्ह्याचा अर्थिक चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांना अर्थिक बळ दिले, याच पध्दतीचे काम यापुढे समन्वयाने करायचे आहे.' 

ते म्हणाले,"जिल्ह्यात संघर्ष नवा नाही. पक्षापेक्षा स्थानिक संदर्भ या निवडणुकीत महत्त्वाचे होते. त्या स्थानिक संदर्भावरच या निवडणुका झाल्या. कोणी तरी तुम्हाला निवडून आणलंय आणि कोणीतरी पाडलय असे कॉलरला हात लावून सांगण्याची हिंमत कुठल्या नेत्यांत किंवा कार्यकर्त्यांत नाही. कोणाला कोण निवडून आणू शकत नाही आणि कोण पाडूही शकत नाही. असा हा आपला जिल्हा आहे.' 

स्वागत संचालक भैय्या माने यांनी केले. संचालक पी. जी. शिंदे, अनिल पाटील, विलास गाताडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आर. के. पोवार, उदयानी साळुंखे, रणजितसिंह पाटील, संतोष पाटील आदि उपस्थित होते. आभार कार्यकारी संचालक डॉ. ए. बी. माने यांनी मानले. 

यड्रावकरांनी सत्तेसोबत यावे 

राजेंद्र पाटील अपक्ष आहेत, गुलदस्त्यात त्यांनी वेळ काढू नये, सत्तेसोबत त्यांनी यावे असे आवाहन करतानाच प्रा. मंडलिक म्हणाले, जिल्ह्यातील प्रश्‍न बघितल्यानंतर जनादेश देताना सर्वच पक्षांना समान वाटा जनतेने दिला आहे. शहरातील प्रश्‍न शिवसेना, भारतीय जनता पक्ष चागंल्या पध्दतीने सोडवू शकतील तर ग्रामीण भागातील प्रश्‍नांना काँग्रेस, राष्ट्रवादी न्याय देईल हाही या जनादेशाचा उद्देश आहे.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sanjay Mandlik Criticism On Minister Chandrakant Patil