esakal | लाडांनी ना पैसे बुडवले, ना कारखाना; जयंत पाटील यांची भाजपवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Mr. Lad did not cheated for money, nor closed factory; Jayant Patil criticizes BJP

महाविकास आघाडीचे पदवीधर उमेदवार अरुण लाड, शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर हे दोघेही विश्‍वासात पात्र ठरतील, असा विश्‍वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. 

लाडांनी ना पैसे बुडवले, ना कारखाना; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली ः पुणे विधानपरिषद पदवीधर, शिक्षक उमेदवारांबद्दल विरोधकांना बोलण्याची संधीच नाही. दोघांची प्रतिमा स्वच्छ व पारदर्शी आहे. त्यांनी कोणाला बुडवले नाही, ऊसाचे पैसे तर बुडवले नाहीतच किंवा साखर कारखाना खासगी केलेला नाही. महाविकास आघाडीचे पदवीधर उमेदवार अरुण लाड, शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर हे दोघेही विश्‍वासात पात्र ठरतील, असा विश्‍वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. 

पुणे महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ तिन्ही पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, आमदार सुमन पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते, स्वाभिमानीचे महेश खराडे प्रमुख उपस्थित होते. 

जयंत पाटील म्हणाले, "विधानपरिषद निवडणूक सार्वत्रिक नाही. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी तालुका, गाव, महापालिका, नगरपालिका नियोजन कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र येवून मतदार यादी समोर ठेवून काम करावयाचे आहे. भाजप उमेदवारावर अप्रत्यक्षपणे टीका करताना ते म्हणाले, ""आमच्या उमेदवारांनी कोणाला बुडवले नाही. ऊसाचे पैसे तरी बुडवले नाहीत आणि कारखानाही खासगी केलेला नाही. पदवीधरचे उमेदवार लाड यांना तर स्वातंत्र चळवळीचा वारसा आणि समाजवादी विचारसरणी जोपासली आहे. शिक्षक उमेदवार आसगावकर यांनीही शिक्षक प्रश्‍न सोडवण्यासाठी आयुष्य खर्च केले आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे दोन वर्षापासूनच उद्योग क्षेत्राचे उत्पादन घटले. परिणामी मंदी, बेरोजगारी आली.

पदवीधरांच्या समस्या भाजपनेच वाढवल्या.' चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता ते म्हणाले, यापूर्वी प्रतिनिधीत्व करणारे चांगल्या पदावर असताना त्यांच्या तोंडून पदवीधरांचा एकही प्रश्‍न सुटलेला माझ्या ऐकिवात नाही. 

उदय सामंत म्हणाले, "शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठिंशी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्वजण कामाला लागलो आहे. 
डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, "स्वतंत्र लढा, क्रांतीचा इतिहास असलेल्याचा वारस निवडणुकीत आहे. शेतकरी आणि परिसराच्या विकासात त्यांचे योगदान आहे. क्रांतीचा अग्रगण्य कारखान्यात समावेश आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, ""पदवीधरांच्या प्रश्‍नांसाठी चंद्रकांत पाटील यांनी काही केलेले नाही. भाजपची मक्तेदारी यंदा मोडून काढू. विशाल पाटील म्हणाले, ""यावेळी विचाराची लढाई आहे.'' अरुण लाड म्हणाले, "यापूर्वीच्या पदवीधरांच्या लोकप्रतिनिधीबद्दल मतदारांची मोठी नाराजी यंदा मतपेटीतून व्यक्त होईल.' उमेदवार जयंत आसगावकर यांनी यापूर्वीच्या उमेदवारांनी कशासाठी निवडणूक लढवली याचा आमदार झाल्यावर विसर पडल्याची टीका केली. 
आमदार अनिल बाबर, शिवसेनेचे विभूते, बजरंग पाटील यांचीही भाषणे झाली.

जयश्रीताई पाटील, संजय बजाज, छायाताई पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्यासह तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी स्वागत केले. राहूल पवार यांनी आभार मानले. 

यापूर्वी दुर्लक्षामुळे पराभव 
श्री. पाटील म्हणाले, "आपण या निवडणुकीकडे काळजीपूर्वक लक्ष देत नसल्याने दोन वेळा पराभव झाला. आता यावेळी जागरुक राहा. 20-25 मतदारासाठी कार्यकर्ता नेमा.' 

संपादन : युवराज यादव