
कडेगावात गगनचुंबी ताबुतांची आज गळाभेट
कडेगाव - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून कडेगावचा मोहरम राज्यभर ओळखला जातो. यानिमित्त गगनचुंबी ताबुतांची उभारणी पूर्ण झाली असून, उद्या (ता. ९) त्यांचा गळाभेट सोहळा होणार आहे.
उद्या सकाळी ११ वाजता पाटील वाडा येथे पहिली भेट, तर दुपारी १ वाजता सुरेशबाबा देशमुख चौक येथे मुख्य भेट सोहळा होईल. यासाठी शहरात प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नगरपंचायतीने मोहरम मार्गावर विविध सोयी-सुविधा पुरविल्या आहेत.
येथील मोहरम उंच ताबुतांसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून, दीडशे वर्षांपासून ही परंपरा आजही जोपासली जाते. आज (ता. ८) पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने ‘फातेहा’ होऊन ताबूत उभारणीला सुरवात केली; तर सायंकाळी ताबुतांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पाटील वाड्यातून आंबील मिरवणूक काढण्यात आली. ती पिरजादे वाड्यातून मसूदमाता बारा इमाम येथे नेण्यात आली. कत्तलरात्र असल्याने मानाच्या सातभाई ताबुतासह सर्वच ताबुतांजवळ व मसूदमाता येथे लोकांनी लक्षणीय गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या दरम्यान शुक्रवार पेठ मेल व बुधवार पेठ मेल यांच्यात नानकशा, भाट, जोगी व गोरखचा सामना उत्साहात पार पडला; तर करबल सोंगाने मोहरममध्ये मोठी रंगत भरली.
दरम्यान, ताबुतांची उभारणी पूर्ण झाली असून, आज मुख्य भेटीचा सोहळा होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, कडेगाव महसूल विभागासह कडेगाव नगरपंचायतीकडून सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपाधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये एक पोलिस उपाधीक्षक, दोन निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, १४ उपनिरीक्षक, २२० पोलिस, ४० होमगार्ड, एक दंगल काबू पथक यांचा समावेश असणार आहे.