महापालिकेचे दवाखाने हाऊसफुल्ल; कोरोनाबाह्य रुग्णांची सोय

शैलेश पेटकर
Wednesday, 9 September 2020

कोरोना नसलेल्या रुग्णांची सध्या फरफट होताना दिसत आहे. सांगली शहरातील खासगी दवाखान्यात कोरोना चाचणी केल्याशिवाय उपचार मिळत नाहीत. मात्र, महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्रे कोरोनाबाह्य रुग्णांसाठी आधार ठरत आहेत.

सांगली : कोरोना नसलेल्या रुग्णांची सध्या फरफट होताना दिसत आहे. शहरातील खासगी दवाखान्यात कोरोना चाचणी केल्याशिवाय उपचार मिळत नाहीत. मात्र, महापालिकेची शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे कोरोनाबाह्य रुग्णांसाठी आधार ठरत आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील दहा दवाखान्यात दररोज सुमारे एक हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. सर्व उपचार मोफत असून याठिकाणी 26 प्रकारच्या चाचण्या होत आहेत. 

राष्ट्रीय अभियानांतर्गत दोन वर्षांपूर्वी महापालिका क्षेत्रात दहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्‍टरांसह पुरेसा स्टाफ देण्यात आला. जागोजागी खासगी दवाखाने असल्याने पालिकेची ही प्राथमिक आरोग्य केंद्रे दुर्लक्षित राहिली. मात्र येते गोरगरिब रुग्णांना उपचार मिळत होते. त्यावेळी या आरोग्य केंद्रांमध्ये दिवसाला सुमारे 10 ते 30 इतकेच रुग्ण उपचार घेत होते. 

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने गेली पाच महिने शहरातील आणि जिल्ह्यातील काही खासगी दवाखान्यांमध्ये हातचे राखूनच उपचार केले जात आहेत. तर काही दवाखाने बंदच आहेत. यामुळे सर्दी, ताप, खोकला यासह संसर्गजन्य आजार असणाऱ्या रुग्णांची उपचारासाठी फरफट सुरू झाली. याकाळात हे दवाखाना कोरोनाबाह्य रुग्णांसाठी आधार ठरले. त्याचा फायदा महापालिका क्षेत्रातील जनतेला होत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव जसा वेगाने वाढला, तसे खासगी दवाखान्यात रुग्णांना कोरोना चाचणी करण्याचा आग्रह धरला जात आहे. चाचणीचा अहवाल नसल्यास रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होतांना दिसत आहे. सध्या एका दवाखान्यात दररोज शंभर रुग्णांना तपासले जाते. मोफत औषधेही दिली जातात. तसेच रक्ताच्या चाचण्यांसह 26 विविध प्रकारच्या चाचण्याही याठिकाणी केल्या जातात. तसेच गरोदर मातांची सोनोग्राफी मोफत केली जाते. याशिवाय रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआरच्या चाचण्याही याठिकाणी केल्या जातात. महापालिका क्षेत्रातील रुग्णांना ही मोफत सोय असल्याने हे दवाखाने आधार ठरत आहे. 

इथे आहेत दवाखाने 
जामवाडी, साखर कारखाना परिसर, शामरावनगर, हनुमाननगर, विश्रामबाग, अभयनगर, समतानगर, द्वारकानगर, मालगाव रस्ता, लक्ष्मी मार्केट परिसर 

प्रभागासाठी वैद्यकीय सहायक 
दवाखाना असणाऱ्या परिसरातील दहा हजार लोकसंख्येसाठी एक वैद्यकीय सहायक नेमण्यात आला आहे. तसेच अडीच हजार लोकसंख्येसाठी एक आशा वर्कर नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रभागात "घर टू घर' सर्वे केला जातो. 50 नागरिकांची आरोग्याची माहिती संकलन केली जाते. 

दवाखान्यांचा आधार

महापालिका क्षेत्रात दहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत. त्याठिकाणी भागातील रुग्णांची सोय होत आहे. गेल्या काही दिवसांत अनेकांना या दवाखान्यांचा आधार मिळाला आहे. खासगी डॉक्‍टरांनीही आता सेवा देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. 
- नितीन कापडणीस, आयुक्त, महानगरपालिका 

संपादन- युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal dispensaries housefull by non corona patients