स्वच्छता केली, वसुली राहिली.. 

The municipality did the cleaning the recovery remained
The municipality did the cleaning the recovery remained

नगर : महापालिका प्रशासनाकडून गेला दीड महिना शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात सर्वच अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. त्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यातून नगर शहर स्वच्छही झाले. मात्र, या काळात नगर शहरातील मालमत्ताकराच्या वसुलीकडे दुर्लक्ष झाले आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेची वसुली मोहीम या काळात थंडावल्याने खर्चाची बाजू खिळखिळी होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वसुली विभागाला दीड महिन्यात 40 कोटी रुपयांची वसुली करायची आहे. 

तत्कालीन महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग निवृत्त झाल्यानंतर महापालिकेच्या प्रभारी आयुक्‍तपदाचा कारभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हाती आला. कारभार मिळताच त्यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला महापालिकेच्या वसुली विभागाच्या कामाचा आढावा घेतला. शहरात विकासासाठी निधी आवश्‍यक असल्याने वसुली होणे आवश्‍यक असल्याचे सांगत त्यांनी मार्चअखेरपर्यंत वसुलीचे 48 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत सहभाग घेतल्याने नगर शहर स्वच्छ करत देशात पहिल्या शंभरात आणण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंग झाडून काम केले. यात चारही प्रभागांतील वसुली विभागाचे कर्मचारीही सहभागी होते. त्यामुळे वसुलीवर स्वच्छता मोहिमेचा परिणाम झाला. दोन महिन्यांत केवळ सात कोटी 66 लाख रुपयांचीच वसुली शक्‍य झाली. 

नगरजवळील गावांचा पाणीपुरवठा खंडीत 

आता दीड महिन्यात सुमारे 40 कोटी रुपयांचे उद्दिष्ट वसुली विभागाला गाठायचे आहे. त्यामुळे वसुली विभागाने आता पुन्हा वसुलीची कारवाई सुरू केली आहे. नगर शहराजवळील देहरे, शिंगवे नाईक व विळद गवळीवाड्यात महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो. या गावांची 1999पासूनची पाणीपट्टी थकीत असल्याने त्यांचा पाणीपुरवठा महापालिका प्रशासनाने खंडित केला आहे. विळद गवळीवाड्याकडे 48 लाख 26 हजार, शिंगवे नाईककडे 31 लाख 75 हजार, तर देहऱ्याकडे 1 कोटी 93 लाख 43 हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. 

शासकीय कार्यालयांकडे मोठी थकबाकी 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून डिसेंबर महिन्यातच 15 लाख रुपयांचे चार धनादेश प्राप्त झाले होते. त्यांतील दोन धनादेश आगामी दोन महिन्यांत देय होतील, अशी अपेक्षा आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील गाळ्यांच्या मालमत्ताकराची वसुलीही प्रस्तावित आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालये व राजकीय वरदहस्त असलेल्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. महापालिका प्रशासन त्यांच्याकडून वसुली करील का, याची उलटसुलट चर्चा सध्या महापालिकेत सुरू आहे. 

सहकारनगरमधील पाच गाळे "सील' 

सहकारनगरमधील सपकाळ हॉस्पिटल चौकात असलेल्या गुलमोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाच गाळ्यांचा 21 लाख रुपयांचा मालमत्ताकर थकीत होता. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने व महापालिका उपायुक्‍त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे पाचही गाळे "सील' करण्यात आले. महापालिकेचे वसुली विभागप्रमुख गबाजी झिने, करनिरीक्षक संजीव उमाप, बबन काळे, करण ढापसे यांच्यासह चार ते पाच कर्मचाऱ्यांच्या पथकाने आज दुपारी बाराच्या सुमारास ही कारवाई केली. 21 दिवसांत मालमत्ताकर न भरल्यास या गाळ्यांची लिलावप्रक्रिया करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com