मुनिर खान चालवतात 25 वर्षापासून पाणपोई 

सुनील अकोलकर
बुधवार, 30 मे 2018

उन्हाळा आला की पाणपोयांवर वर्दळ दिसायची. पूर्वी रस्त्याने भरपूर पाणपोया दिसत. आता मात्र, शोधूनही या पाणपोया सापडत नाहीत. मात्र, तिसगाव येथील मुनीर खान यांनी 26 वर्षांपासून चालू केलेली पाणपोई आजही सुरु आहे.

तिसगाव(नगर) - उन्हाळा आला की पाणपोयांवर वर्दळ दिसायची. पूर्वी रस्त्याने भरपूर पाणपोया दिसत. आता मात्र, शोधूनही या पाणपोया सापडत नाहीत. मात्र, तिसगाव येथील मुनीर खान यांनी 26 वर्षांपासून चालू केलेली पाणपोई आजही सुरु आहे. येथील बसस्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर 1992 साली मुनीर खान यांनी पाणपोई सुरू केली. त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय असून दुकानासमोरील झाडाजवळ रांजण ठेवून त्यांनी ही पाणपोई सुरू केली.

आसपासच्या गावातून कामानिमित्त येणारे ग्राहक, वाटसरू, जवळच असलेल्या मराठी शाळेतील मुले, ग्रामीण भागातील महिला  या सगळ्यांची गरज ओळखून मुनीर खान यांनी पाणपोई सुरू केली. सुरवातीच्या काळात कावडीने पाणी विकत घेतले जात होते. आजही विकत पाणी घेऊन वाटसरूंची तहान भागविण्याचा उपक्रम चालूच त्यांच्यामार्फत चालू आहे. मागील तीन वर्षांपासून तर बाराही महिने ही पाणपोई चालू असते.  दररोज सकाळी नित्यनियमाने सकाळी रांजण धुवून शुद्ध पाणी भरण्याचे काम ते स्वतःच करतात. मागील वर्षी या सेवेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थाच्या वतीने जेष्ठनेते काशिनाथ लवांडे यांच्या हस्ते मुनीर खान यांचा सत्कार करण्यात आला होता.

Web Title: Munir Khan has been running a Panpoi from 25 years