ब्रेकिंग ; अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकांच्या भावाचा निर्घृण खून ; डोक्‍यात कोयत्याने वर्मी घाव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

खटाव (ता. पलूस) येथील माजी सरपंच व राष्ट्रवादीचे नेते आनंदराव धोंडिराम पाटील (वय 54) यांचा भरदिवसा धारदार कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला.

भिलवडी (सांगली) : खटाव (ता. पलूस) येथील माजी सरपंच व राष्ट्रवादीचे नेते आनंदराव धोंडिराम पाटील (वय 54) यांचा भरदिवसा धारदार कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला. दुपारी साडेअकरा ते बाराच्या सुमारास शेतातून घराकडे मोटारसायकलवरून जात असताना हा हल्ला झालाने परिसरात खळबळ उडाली आहे. सांगलीतील शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, आनंदराव यांचे कनिष्ठ बंधू गजानन पाटील (अप्पर जिल्हाधिकारी) हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस कसून तपास करीत आहेत. दोन संशयित हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपसात पुढे आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

हे पण वाचा - टेरेसवरच बहरली तोंडाला पाणी सुटेल अशी स्ट्रॉबेरी 

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की आनंदराव पाटील यांची खटाव-माळवाडी रस्त्यावर द्राक्षबाग आहे. आज सकाळी आनंदराव पाटील नेहमीप्रमाणे द्राक्षबागेत गेले होते. धाकटा मुलगा विश्‍वजितही शेतात आला होता. तेथून दुपारी ते मोटारसायकलवरुन (एमएच 10 एम 7030) घरी परतत होते. गावानजीकच्या गजानन अण्णा पाटील यांच्या शेतानजीक त्यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला. डोक्‍यात घाव वर्मी बसल्याने ते रस्त्याकडेच्या हरभरा पिकात कोसळले. त्यांची दुचाकी रस्त्याकडेला पडली होती. घाव जोरदार असल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काही वेळातच त्यांचा मुलगा विश्‍वजित रस्त्यावरून घरी येत असताना येथे आला. त्याला वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. घटनास्थळी मोटारसायकल, रक्ताने माखलेला धारदार कोयता, दोन मोबाईल, चष्मा पडलेला होता. घटनास्थळी लोकांची बराच काळ गर्दी केली होती. गावात मात्र शांतता होती. सिव्हील हॉस्पिटल परिसरात मात्र अनेक राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांसह गर्दी केली होती. 

हे पण वाचा - मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांपुढे कोणते मोठे आव्हान...?

""घटनेनंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कसोशीने सुरू आहे.'' 

-मनिषा दुबुले, अप्पर पोलिस अधिक्षक, सांगली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of Ajit Pawars aided assistants brother