अनैतिक संबंधातील वादातून टेरेसवरून दिले ढकलून अन्...

Murder In Immoral Relationship Sangli Marathi News
Murder In Immoral Relationship Sangli Marathi News

सांगली - जत तालुक्‍यातील मुचंडी येथे माळरानावर अनोळखी तरूणाचा निर्घृण खून करून मृतदेह पेट्रोलने जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार आठ दिवसापूर्वी घडला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या गुन्ह्याचा कसून तपास करून तो उघडकीस आणला. मृत तरूण सुशांत नागनाथ चौधरी (वय 30, रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) येथील असल्याचे निष्पन्न केले. अनैतिक संबंधातून दोघांनी त्याचा काटा काढून मृतदेह मुचंडी येथे आणून टाकल्याचे उघडकीस आणले. 

सुशांतच्या खूनप्रकरणी समाधान दिलीप चौधरी (वय 27 रा. नाळेवस्ती टेंभुर्णी) आणि सागर विष्णू जमदाडे (वय 30, कसबा पेठ, शिवाजीनगर, टेंभुर्णी) या दोघांना अटक करून "एलसीबी' च्या पथकाने क्‍लिष्ट गुन्हा अखेर आठवड्यात उघडकीस आणला. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी

अधिक माहिती अशी, मृत सुशांत चौधरी याचे संशयित आरोपी समाधान चौधरी याच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या महिलेला माझ्यासोबत पाठवून दे असा सुशांतने समाधानकडे तगादा लावला होता. तसेच सुशांत या अनैतिक संबंधांच्या कारणातून समाधानला वारंवार बदनाम करत होता. तिला माझ्याकडे पाठवले नाहीत तर तुला व तुझ्या मुलींना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे जीवन उध्वस्त करीन अशी धमकी देखील देत होता. त्यामुळे समाधान त्याच्यावर चिडून होता. 

डोक्यात दगड घालून खून

दोघांच्या वादाबाबत 20 डिसेंबर रोजी समाधानच्या ऑफीसच्या टेरेसवर चर्चा सुरू होती. समाधान आणि सुशांत यांच्यात वादावादी सुरू असताना सागर जमदाडे तिथे आला. वाद वाढत गेल्यानंतर समाधान याने अचानक सुशांतला टेरेसवरून खाली ढकलून दिले. उंचावरून खाली पडलेला सुशांत गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्यानंतर समाधान व सागर खाली धावले. दोघांनी बेशुद्धावस्थेतील सुशांतला उचलून मोटारीत घातले. जत तालुक्‍यातील मुचंडी गावच्या हद्दीत निर्जन माळावर सुशांतला आणले. तिथे त्याच्या डोक्‍यात दगड घालून खून करून अंगावर पेट्रोल ओतून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघे तेथून पळाले. 

अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघडकीस

मुचंडी गावात अज्ञात तरूणाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्यामुळे खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले यांनी "एलसीबी' च्या पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. एलसीबी चे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी तातडीने पथक नियुक्त केले. शेजारील सोलापूर, विजापूर, नगर, सातारा जिल्ह्यात कोणी बेपत्ता झाले काय? याचा शोध सुरू केला. तेव्हा तपासात टेंभुर्णी येथील सुशांत चौधरी हा बेपत्ता असल्याची माहिती खबऱ्यामार्फत उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, कर्मचारी अनिल कोळेकर, संदीप गुरव यांना मिळाली. कसून तपास केल्यानंतर अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघडकीस आणत समाधान चौधरी व सागर जमदाडे या दोघांना अटक केली. 

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या तपास पथकात उपनिरीक्षक चौधरी, बिरोबा नरळे, अनिल कोळेकर, संदीप गुरव, संदीप नलवडे, सागर लवटे, हेमंत ओमासे, सागर टिंगरे, संजय पाटील, जितेंद्र जाधव, राजेंद्र मुळे, राजू शिरोळकर, अरूण सोकटे, बजरंग शिरतोडे यांचा समावेश होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com