कुपवाड ब्रेकिंग...राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा भरदिवसा भोसकून खून 

dattatray patole.jpg
dattatray patole.jpg

कुपवाड (सांगली)- येथील युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे (वय 41, रा. वाघमोडेनगर) यांचा थरारक पाठलाग करून धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याचा प्रकार आज दुपारी घडला. मिरज औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल अशोकासमोरील रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये पाटोळे यांचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात पाटोळे यांचा खून आर्थिक वादातून झाला असावा अशी शक्‍यता आहे. तिघा हल्लेखोरांनी खून करून पलायन केले असून त्यांचा शोध सुरू आहे. 

दत्तात्रय पाटोळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सक्रीय पदाधिकारी आहेत. महापालिका निवडणुकीत ते इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले होते. औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवण्याचे त्यांच्याकडे कंत्राट होते. आज दुपारी 12 च्या सुमारास ते दुचाकीवरून मिरज औद्योगिक वसाहतीकडे निघाले होते. त्याचवेळी हॉटेल अशोकासमोर तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात ते दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पळू लागले. हॉटेलसमोरच असलेल्या रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये त्यांनी धाव घेतली. तेव्हा तिघे हल्लेखोर मारण्यासाठी धावले. तिघांनी आतमध्ये घुसून पाटोळे यांना गाठले. धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्‍यावर आणि इतरत्र वार केले. पाटोळे यांना वाचवण्यासाठी एक कामगार धाडसाने पुढे आला. परंतू हल्लेखोरांनी त्याच्यावरही वार केला. हातावर वार झाल्यामुळे तो जखमी झाला. तोपर्यंत अतिशय निर्घृणपणे वार झाल्यामुळे काही क्षणातच पाटोळे मृत झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

खुनाची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस तत्काळ धावले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपसिंह गिल, कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे आणि पथक घटनास्थळी होते. परिसरात नागरिकांची गर्दी जमली. गर्दी हटवून पंचनामा करण्यास सुरवात केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा खून झाल्याचे समजताच शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. उपाधीक्षक गिल यांनी पोलिसांना तातडीने तपासाबाबत सूचना दिल्या. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले. प्राथमिक तपासात आर्थिक वादातून खून झाला असावा अशी शक्‍यता आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

संपादन : घनशाम नवाथे 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com