सिगारेट ओढण्यास माचिस न दिल्याने या तिघांनी केले असे कृत्य...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

माचिस (आगपेटी) न दिल्याने झालेल्या वादातून चित्रदुर्गमधील ट्रक क्‍लीनरचा निर्घृण खून करण्यात आला. जुना पीबी रोडवरील येथील शेतात बुधवारी (ता. १५) सकाळी ही घटना उघडकीस आली.

बेळगाव - सिगारेट ओढण्यासाठी माचिस (आगपेटी) न दिल्याने झालेल्या वादातून चित्रदुर्गमधील ट्रक क्‍लीनरचा निर्घृण खून करण्यात आला. जुना पीबी रोडवरील येथील शेतात बुधवारी (ता. १५) सकाळी ही घटना उघडकीस आली. मोहम्मद शमीउल्ला शफीउल्ला (वय ४१, रा. चित्रदुर्ग) असे त्यांचे नाव आहे. तिघांनी मिळून ही हत्या केली असून यापैकी एका संशयिताला अटक झाली आहे. राजू मल्लेशी लोकरे (वय २२, रा. मंगाईनगर, वडगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. 

जुन्या पीबी रोडवरील घटना

याबाबत शहापूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहम्मद शफीउल्ला हा ट्रकवर क्‍लीनर असून मंगळवारी (ता. १४) ट्रकमधून नारळ घेऊन बेळगावात आला. येथील रविवार पेठेतील एका दुकानात नारळ उतरवून रात्री चालक ट्रकमध्येच झोपी गेला. मोहम्मद बाहेरुन जेवण करुन येतो, असे सांगून चालकाकडून पैसे घेऊन जुन्या पीबी रोडवरील बारमध्ये गेला. त्याठिकाणी मद्यप्राशन करताना त्याची संशयित राजूसह अन्य दोघांशी ओळख झाली. यावेळी संशयित राजू सिगारेट ओढत होता. ते पाहून मोहम्मदलाही सिगारेट ओढण्याची इच्छा झाली. त्यातून त्याने राजूकडे आगपेटी मागितली. पण, राजूने नसल्याचे सांगत देण्यास नकार दिला. मोहम्मदने स्वत: सिगारेट ओढतोस; पण मी मागितल्यावर माचिस नाही असे का सांगतोस, असे म्हणत वाद काढला. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली. दोघांनी एकमेकांना शिवीगाळही करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बार मालकाने मोहम्मद, राजू व त्याचे दोन मित्र अशा चौघांनाही बाहेर हाकलले. त्यानंतर चौघेही पार्सल घेऊन येथून बाहेर पडले. जुना पीबी रोड येथील यल्लाप्पा रामण्णावर यांच्या मालकीच्या शेतात आल्यानंतर चौघांनीही पुन्हा दारु पिण्यास सुरवात केली. 

पाहा - त्या मांजराची तस्करी करणे पडले चांगलेच महागात

यावेळी राजूने बारमधील वाद उकरून काढला. त्यामुळे मोहम्मदला मारहाण करून राजूने तेथून पळ काढला; पण मोहम्मदने त्याचा पाठलाग केला. एका ठिकाणी चिखलात पाय रुतल्यामुळे मोहम्मद खाली कोसळला. त्याचवेळी राजूसह त्याच्या मित्रांनी शेतातील मातीचा ढेकूळ उचलून मोहम्मदच्या डोक्‍यात घातला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदचा काही वेळात 
मृत्यू झाला. 

हल्लेखोर राजूची रात्र शेतातच

मोहम्मद याची हत्या झाल्यानंतर पहाटे २ वाजेपर्यंत पुन्हा राजूसह तिघांनी शेतातच मद्यप्राशन केले. अतिमद्यप्राशनामुळे संशयित राजू तेथेच झोपी गेला. तर त्याचे अन्य दोघे निघून गेले. बुधवारी सकाळी सहा वाजता राजूला जाग आल्यानंतर त्याने मोहम्मदला उठविण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भीतीपोटी राजूने शहापूर पोलिसांची भेट घेऊन घटनाक्रम सांगितला. यानुसार पोलिसांनी त्याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. तर अन्य दोघे फरारी झाले असून त्यांचा पोलिसांनी शोध चालविला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder for not smoking cigarettes belgum news