भरचौकात धारदार शस्त्राने दाबेली विक्रेत्याचा खून; हल्ल्यात डोळे, चेहरा, छातीवर जोरदार वार I Sangli Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of Dabeli seller in Sangli Kupwad

कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यातूनच उद्‌भवलेल्या भांडणातून तिघांनी शुभमवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

Sangli Crime : भरचौकात धारदार शस्त्राने दाबेली विक्रेत्याचा खून; हल्ल्यात डोळे, चेहरा, छातीवर जोरदार वार

कुपवाड : दाबेली विक्रेत्यावर (Dabeli Seller) धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना यशवंतनगर चौकात घडली. शुभम संतोष माने (वय २२, रा. माळी वस्ती, संजयनगर) असे मृत दाबेली विक्रेत्या युवकाचे नाव आहे.

याबाबत रात्री उशिरा कुपवाड पोलिसांत (Kupwad Police) नोंद झाली. या प्रकरणी पोलिसांनी यश सौंदडे (वय २२), प्रतीक वगरे (१९, दोघेही रा. यशवंतनगर) यांच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. याबाबत घटनास्थळाहून मिळालेल्या व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शुभम याचा यशवंतनगर चौक परिसरात सँडवीच आणि दाबेली स्नॅक्सचा हातगाडा आहे.

वर्षभरापासून तो हातगाड्यावर व्यवसाय चालवतो. काल रात्रीच्या सुमारास दोन संशयित हल्लेखोर त्याच्या हातगाड्यावर आले. कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यातूनच उद्‌भवलेल्या भांडणातून तिघांनी शुभमवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. हल्ल्यात डोळे, चेहरा व छातीवर वार झाल्याने शुभम गंभीर जखमी झाला.

तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शुभम यास उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तस्राव झाल्याने उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घडलेल्या प्रकारानंतर सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके धाडण्यात आली. काही वेळातच पोलिसांनी यश सौंदडे, प्रतीक वगरे व अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. अधिक चौकशीत या प्रकरणात अन्य एका संशयिताचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मिरजेचे उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी भेट देऊन पाहणी केली.