म्हैसूर - धारवाड एक्सप्रेस लवकरच मिरजपर्यंत धावणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

एक नजर

  • आता म्हैसूर - धारवाड एक्सप्रेस ( एक्सप्रेस क्रमांक 17301 व 17302 ) मिरजेपर्यंत धावणार
  • प्रस्तावाला दक्षिण-पश्चिम विभागाची मंजुरी
  • रेल्वे राज्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार हा निर्णय
  • कधीपासून धावणार हे मात्र अद्याप अनिश्चित. 

मिरज -  आता म्हैसूर - धारवाड एक्सप्रेस ( एक्सप्रेस क्रमांक 17301 व 17302 ) मिरजेपर्यंत धावणार आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार हा निर्णय झाला आहे. कधीपासून धावणार हे जाहीर केलेले नाही, मात्र प्रस्तावाला दक्षिण-पश्चिम विभागाने मंजुरी दिली आहे. यानिमित्ताने मिरजेतून दक्षिण भारतात जाण्यासाठी आणखी एक रेल्वे उपलब्ध झाली आहे. 

रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी तशी शिफारस केली होती. म्हैसूरमधून ही एक्सप्रेस दररोज रात्री साडेदहा वाजता सुटते. त्याऐवजी आता दिड तास अगोदर म्हणजे रात्री नऊ वाजता सुटेल. हुबळीमध्ये सकाळी 7.10 वाजता पोहोचते, त्याऐवजी पहाटे 6.10 वाजता येईल. सध्या तिची देखभाल दुरुस्ती हुबळी जंक्शनमध्ये केली जाते, मात्र नव्या वेळापत्रकानंतर म्हैसूरमध्ये केली जाईल. हुबळीमध्ये त्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नवे वेळापत्रक असे

म्हैसूरमधून रात्री 9 वाजता सुटेल. हुबळीमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे 6.10 वाजता पोहोचेल. बेळगावमध्ये सकाळी 9.10 वाजता पोहोचेल. पाच मिनिटांच्या थांब्यांतर सव्वानऊ वाजता मिरजेसाठी सुटेल. मिरजेत दुपारी 1.20 वाजता येईल.

येथे तिला 1 तास 50 मिनिटांचा थांबा दिला आहे. दुपारी 3.10 वाजता परतीच्या प्रवासला निघेल. बेळगावमध्ये संध्याकाळी 5.40 वाजता पोहोचेल. हुबळीमध्ये रात्री 9.35 वाजता व म्हैसूरमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी 7.05 वाजता पोहचणार आहे. 

या एक्सप्रेसला 18 डबे आहेत. त्यामध्ये पाच सर्वसाधारण आणि 8 स्लिपर श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे. यानिमित्ताने सांगली - कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रवाशांना दक्षिणेत जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mysore - Dharwad Express run up to Miraj