गणेशोत्सव वर्गणीची रक्कम दिली 'एड्सग्रस्त' चिमुकल्यांसाठी !

हरिभाऊ दिघे 
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

संगमनेर अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव वर्गणीतून १३ हजार रुपये जमा केले. मात्र जमा केलेल्या वर्गणीतून डीजे व अनावश्यक खर्च करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा विचार विद्यार्थ्यांनी डॉ. एम. आर. वाकचौरे यांच्यासमोर मांडला.

तळेगाव दिघे (जि. नगर) : गणेशोत्सव वर्गणीतील जमा झालेल्या रकमेतून मोठी गणेशमुर्ती, मोठा देखावा, महाप्रसाद असा खर्च केला जातो. विसर्जनाच्या दिवशी डीजे लावून हिंदी गाण्यांवर नाचण्याचे चित्र आता नवे राहिले नाही. उत्सवात जमलेल्या रकमेतून सामाजिक कार्य न करता समाजास बिघडविण्याचे काम होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. या सर्व प्रकारास फाटा देत डॉ. मधुकर वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर ( अमृतनगर ) येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्सग्रस्त चिमुकल्या मुलांना देणगी देत समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे.

संगमनेर अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव वर्गणीतून १३ हजार रुपये जमा केले. मात्र जमा केलेल्या वर्गणीतून डीजे व अनावश्यक खर्च करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा विचार विद्यार्थ्यांनी डॉ. एम. आर. वाकचौरे यांच्यासमोर मांडला. सर्व टीमने एच.आय.व्ही. संक्रमित मुलांचे पुनर्वसन करणार्‍या खांडगाव ( ता. संगमनेर ) येथील संतोष पवार यांच्या स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्थेकडे संपर्क साधला. त्यांना ४० एड्सग्रस्त लहान मुलांच्या संगोपनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. या मुलांना चांगले संस्कार, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व मनोरंजन अशा मुलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करुन विद्यार्थ्यांनी दरवर्षीच्या परंपरेला फाटा देत सदर वर्गणीची रक्कम सदर गरजू मुलांना देण्याचे ठरविले व समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. 

विद्यार्थ्यांनी ही कल्पना संस्थेचे मुख्य कार्यकारी अनिल शिंदे यांच्यासमोर मांडली. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. स्वयंप्रेरितचे संतोष पवार यांच्याकडून संस्थेच्या कार्याविषयी अनिल शिंदे यांनी माहिती घेतली. त्यांच्या कार्याला चालना देण्यासाठी श्री. शिंदे यांनी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने रक्कम ८ हजार रुपयांचा धनादेश व मुलांच्या वर्गणीचे १३ हजार रुपये अशी एकुण रक्कम २१ हजार रुपयांची रक्कम अमृतवाहिनीतर्फे संतोष पवार यांच्याकडे सुपूर्त केली.  अमृतवाहिनी शिक्षण संस्था ही ‘‘ब्लड हेल्पलाईन, स्वच्छ-सुंदर संगमनेर, दंडकारण्य अभियान, राष्ट्रीय सेवा योजना’’ यांच्या माध्यमातून सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी महसुलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आमदार डॉ़ सुधीर तांबे, सौ. शरयुताई देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़. एम़. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar news social in sangamner