
या नव्या संघर्षाचा पहिला अध्याय कोण जिंकणार, याकडे आता लक्ष असेल.
पहिला डाव कोण जिंकणार; आघाडीची सत्ता अबाधित राहणार?
कवठेमहांकाळ : आबा विरुद्ध काका...आबा विरुद्ध सरकार...सरकार विरुद्ध काका...कवठेमहांकाळच्या मातीने अलीकडे हा संघर्ष जवळून पाहिला. एवढा टोकाचा संघर्ष की हे लोक एकमेकाच्या हातचे पाणी पिणार नाहीत, असे वाटत होते. पण, राजकारण प्रवाही असते आणि यात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही. नगरपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त हे पुन्हा सिद्ध झाले. कालचे कट्टर विरोधक गळ्यात गळे घालून फिरले आणि ज्याची अजून गणती होत नव्हती तो २३ वर्षांचा तरूण मुख्य विरोधक म्हणून चर्चेत आला. कवठ्यातील या नव्या संघर्षाचा पहिला अध्याय कोण जिंकणार, याकडे आता लक्ष असेल.
नगरपंचायत निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी सत्ता अबाधित ठेवणार? राष्ट्रवादी सत्ता खेचून आणणार? भाजप कमाल दाखवणार की त्रिशंकू स्थिती होणार, याची आता उत्सुकता वाढली आहे. ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरणार आहे. किमान या तालुक्यापुरती समीकरणे निश्चित करणारा हा डाव आहे.
नगरपंचायतीत मोठी राजकीय खलबते झाली. खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची जिल्हा बँकेला झालेली युती नगर पंचायतीत नव्या रंगात दिसली. त्यात महांकाली उद्योग समूहाच्या नेत्या श्रीमती अनिता सगरे आणि गजानन कोठावळे गटही येवून मिळाले. ही राष्ट्रवादीतील फूट होती. त्याचवेळी खासदार पाटील यांचे उमेदवार असताना भाजपने पॅनेल लावून खासदारांना मोठा इशारा याच मैदानातून दिला, हेही लक्षात घेतले पाहिजे.
राष्ट्रवादी म्हणजे सगरे, हे येथील समीकरण मोडून आर. आर. पाटील समर्थक स्वतंत्र गट येथे अस्तित्व राखून असल्याचेही यानिमित्ताने दिसून आले. या रणांगणात पालकमंत्री जयंत पाटील यांनी का हजेरी लावली, हे कोडे कायम राहील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटील एकटे लढताहेत, याची दखल घेतली, हेही लक्षवेधी ठरावे.
कवठेमहांकाळचे राजकारण कूस बदलू पाहत आहे. नवा डाव आकाराला येत आहे. तो इथल्या जनतेने किती स्विकारला आणि किती झिडकारला, हे कळायला मतमोजणीची प्रतिक्षा करावी लागेल. ही निवडणूक रोहित यांच्या एका विधानाने फार गाजली. ‘मी तेवीस वर्षाच्या आहे, पण पंचवीस वर्षाचा होईपर्यंत समोर काही शिल्लक ठेवत नाही’, अशी गर्जना त्यांनी केली. ती बड्या नेत्यांच्या जिव्हारी लागलीच. त्याला उत्तर देताना खासदार पाटील, माजी राज्यमंत्री घोरपडे, सगरे सारे मैदानात उतरले. काकांनी तर संघर्षाची भाषा कराल तर आम्हीही मागे हटणार नाही, असा इशारा देत आबा गटाशी आजवर सौम्य ठेवलेला संघर्ष पुन्हा डोके वर काढू शकतो, असे संकेत दिले. या निवडणुकीत १३ जागांसाठी मतदान झाले. चार जागांची लढत अजून बाकी आहे. १९ जानेवारीला मतमोजणी आहे. ही एका कवठेमहांकाळची निवडणूक नव्हती तर पूर्ण तालुक्याचे राजकीय समीकरण उलटे-पालटे करणारे फासे यावेळी पडले आहेत. ते कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकणारे ठरणार याकडे लक्ष असेल.