नगरकरांसाठी गुड न्यूज ः 211 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, तीन बाधितही ठणठणीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना संसर्गाचा  प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील, तर त्याचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.

नगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जिल्ह्यातील 346  व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.त्यापैकी 25 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान एनआयव्हीकडे 236 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 211 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बाधित तीनही रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

जिल्हाधिकारी दिवेदी यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आणि  आरोग्य विभागाच्या डॉक्टरांशी चर्चा करून या बाबींचा आढावा घेतला. यापुढील काळात अधिकाधिक सतर्क राहून काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

कोरोना संसर्गाचा  प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील, तर त्याचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. अशा 79 जणांना आजअखेर देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान शहरात आढळलेल्या कोरोना बाधित पहिल्या रुग्णास उद्या 14 दिवस पूर्ण होत आहेत. त्याचा अहवाल उद्या एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वत:च्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagarkar Good News 211 Corona Patient Report Negative