
भरती प्रक्रियेत निवड झाल्यामुळे तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.
निपाणी - ध्येय, जिद्द, कष्ट, प्रयत्न आणि सातत्य राखल्यास कोणालाही कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते, हे सिद्ध करून दाखवले आहे, बोरगाववाडीच्या नंदिनी कुमार खोत या मुलीने. नुकत्याच बंगळूर येथे झालेल्या भारतीय सैन्यदलाच्या भरती प्रक्रियेत तिने बीएसएफमध्ये स्थान मिळविले आहे. भारतीय सैन्य दलात निवड होणारी ती बोरगाववाडी आणि परिसरातील एकमेव मुलगी ठरली आहे. त्यामुळे तिचे परिसरातून कौतूक होत आहे.
बोरगाववाडीसारख्या ग्रामीण भागातील मुलगी भारतीय सैन्यात भरती झाल्याने बोरगाववाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नंदिनी खोत हिचे प्राथमिक शिक्षण बोरगाववाडीच्या मराठी शाळेत झाले. विज्ञान शाखेत बारावीपर्यंत शिक्षण घेऊन तिने भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. करिअर अकॅडमीमध्ये तीन महिन्याचे प्रशिक्षण घेतले आणि सराव सुरू केला. आई-वडिलांच्या पाठबळामुळे नंदिनीने तीन वर्ष सातत्याने सराव केला आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी झाली.
गतवर्षी बंगळूर येथे झालेल्या शारीरिक चाचणीत ती उत्तीर्ण झाली होती. पण त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली. भरती प्रक्रियेत निवड झाल्यामुळे तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.
नंदिनीची आई, वडील शेती करतात. आपल्या मुलीने एका वेगळ्या क्षेत्रात उभारी घेतली पाहिजे, या भावनेतून त्यांनी सर्वतोपरी मदत केली. आई-वडिलांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे काम नंदिनीने करून दाखविले आहे. ग्रामीण भागातील एक मुलगी परिघाबाहेरचा विचार करून प्रयत्न, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर एका वेगळ्याच क्षेत्रात आपला ठसा ऊमठवू शकते, हे तिने दाखवून दिले आहे.
हे पण वाचा - वीर पत्नीचा प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा
मुलींसाठी प्रेरणादायी
ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे ज्या वयात मुलीच्या लग्नाचा विचार सुरू असतो, त्या वयात नंदिनीने आपल्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन जिद्दीने प्रयत्नांची पराकाष्टा करून बीएसएफमध्ये जाण्याचे आपलं स्वप्न पूर्ण केले. निश्चितच ही गोष्ट सर्व मुलींसाठी प्रेरणादायी आहे.
आपली मुलगी सैन्यातच भरती व्हावी, यासाठी नेहमी काबाडकष्ट केले. मुलीचे परिश्रम व इच्छाशक्तीमुळे मुलीची सैन्यभरती झाल्याचे ऐकून मन अगदी प्रसन्न तर झालेच उलट सार्थ अभिमानही वाटला. मी शेतकरी असेना पण फौजी मुलीचा बाप आहे'.
-कुमार शंकर खोत, वडील
संपादन - धनाजी सुर्वे