esakal | शेतकरी आंदोलनात नक्षलवादी घुसलेत : गणेश हाके
sakal

बोलून बातमी शोधा

 Naxals entered in farmers' movement: Ganesh Hake

दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन विरोधी पक्षांनी हायजॅक केले आहे. त्यात नक्षलवादी घुसलेत. देशात अराजकता माजवण्यासाठी हा कट रचला गेला आहे, असा आरोप भाजपचे राज्य प्रवक्ते गणेश हाके यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

शेतकरी आंदोलनात नक्षलवादी घुसलेत : गणेश हाके

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन विरोधी पक्षांनी हायजॅक केले आहे. त्यात नक्षलवादी घुसलेत. देशात अराजकता माजवण्यासाठी हा कट रचला गेला आहे, असा आरोप भाजपचे राज्य प्रवक्ते गणेश हाके यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

ते म्हणाले, ""केंद्राने लागू केलेल्या शेतकरी कायद्यांबद्दल गैरसमज पसरवून देशात अशांतता पसवली जात आहे. हे कायदे लागू करण्यासाठी विरोधी पक्ष, मंत्रीमंडळ, शेतकरी संघटना या साऱ्यांना विश्‍वासात घेतले गेले होते. आता कायद्याला विरोध करणाऱ्या शरद पवार यांनीही त्याला संसदेत विरोध केला नव्हता. आता पंजाब, हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत म्हटल्यावर त्यात सारे घुसले आहेत.

देशात 35 लाख आत्महत्या झाल्या, तेंव्हा कुठे होते, जाणते राजे. आंदोलन हायजॅक केले आहे. त्यात "पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्यांचे फोटो आहेत, नक्षलवादी चळवळीतील लोक दिसताहेत. देशविघातक शक्तींचा त्यात प्रभाव वाढला आहे.'' 
ते म्हणाले,""भाजपचा जनाधार वाढत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता आपल्यासोबत कुणीच नाहीत, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाची भिती वाटणारे लोक आयत्या आंदोलनात ते घुसले आहेत. भाजप सरकार मात्र शेतकरी हिताच्या कायद्यांवर ठाम आहे. आम्ही चर्चा करू.

शेतकऱ्यांना भिती वाटणाऱ्या गोष्टींमध्ये बदलही करू, मात्र त्यावर कुणी बोलत नाही. कायदा रद्द करा, एवढीच अंतिम मागणी केली जात आहे. जे घडणारच नाही, त्याचा बाऊ केला जात आहे. बाजार समित्या नष्ट होणार नाहीत, हमीभाव कायम राहील, हे लिहून द्यायला सरकार तयार आहे. दहा हजार फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करून शेतकऱ्यांना बळ दिले जाणार आहे.'' 

भाजप नेते मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष दीपक शिंदे, केदार खाडीलकर, श्रीकांत शिंदे, अशरफ वांकर आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचा खांदा 

गणेश हाके म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा हा कट आहे. देशातील सुजाण शेतकरी तो हाणून पाडेल, त्याची सुरवात झाली असून 20 देशव्यापी संघटनांना कायद्याचे समर्थन केले आहे.'' 

संपादन : युवराज यादव