esakal | राष्ट्रवादी नगरसेवकांचे थेट नेत्यांना आव्हान

बोलून बातमी शोधा

Ncp
राष्ट्रवादी नगरसेवकांचे थेट नेत्यांना आव्हान
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जत (सांगली) : कॉंग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक स्वप्निल शिंदे यांचे राजकीय भवितव्य संपवतील, या भितीने शिंदे उद्‌घाटन घेण्याचे मुद्दाम टाळत आहेत, असे वादग्रस्त संदेश समाज माध्यमात व्हायरल करून राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके यांनी थेट नेत्यांच्या मुलाला आव्हान दिले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

जतच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांचा नेहमीच दबदबा राहिला. ग्रामपंचायत असो किंवा नगरपरिषद त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ सदस्यच काम करतात. नगरसेवक एडके यांनी त्यांच्या मुलाबद्दल केलेले वक्तव्य अनेकांना रूचलेले नाही. पालिका व नगरसेवकांवरचा नेत्यांचा वचक कमी झाला आहे का, असा तर्कवितर्क लावला जात आहे.

जत नगरपरिषदेत नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू ऐडके यांचा कार्यकाळ नेहमी वादळी ठरला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये येताच एडके यांनी त्यांना स्वतःच्या गाडीवर बसवून जतची सैर करवली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची कानउघाडणी केली.

नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्या प्रभागात उद्यानाचे उद्‌घाटन करण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचेच नगरसेवक लक्ष्मण ऐडके यांनी सुरेश शिंदे यांच्या मुलावर कुरघोडी करत वादग्रस्त संदेश व्हायरल करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली. राष्ट्रवादीत राहून पक्षविरोधी भूमिका व नेत्यांवर केलेल्या कुरघोडीबद्दल वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतली, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

टार्गेट तिन्ही नेते...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुरेश शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचा धागा पकडत एडके यांनी हे एकत्र चालतात मग कार्यकर्ते का नाही, असा सवाल करत त्यांचे छायाचित्र व्हायरल केले. त्यामुळे एडकेंनी समाज माध्यमात तिन्ही नेत्यांना टार्गेट केले आहे.

Edited By- Archana Banage