Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या जयंतरावांसमोर तक्रारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP jayant Patil Complaints against office bearers municipal sector politics sangli

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या जयंतरावांसमोर तक्रारी

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादीच्या डागडुजीसाठी कंबर कसली आहे. मिरजेत विश्रामगृहावर शनिवारी मध्यरात्री श्री. पाटील यांनी मध्यरात्री एकपर्यंत राष्ट्रवादीच्या पंधरा आणि सहकारी नगरसेवकांशी ‘वन टू वन’ संवाद साधला. यावेळी श्री. पाटील यांच्यासमोर पालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबाबत तक्रारींचा पाढा वाचला. श्री. पाटील यांनी गंभीरपणे ऐकून पुढील महिन्यात पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे जाहीर केले.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिका क्षेत्राचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शहराध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, प्रदेश संघटक शेखर माने, गटनेते मैन्नुद्दीन बागवान, राहुल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. पाटील यांनी सर्व नगरसेवकांना स्वतंत्रपणे वेळ दिला होता. प्रत्येकाशी संवाद साधून त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. स्थायी समितीच्या निवडीवेळी गैरहजर राहिलेल्या पवित्रा केरीपाळे, संगीता हारगे, महपौर निवडीवेळी मदत केलेले भाजपमधील बंडखोर सदस्यही उपस्थित होते. त्यांच्याशीही जयंत पाटील यांनी संवाद साधला.

गेले काही दिवस पालिका क्षेत्रात राष्ट्रवादीत अंतर्गत पातळीवर धूमशान सुरू आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज, गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्या कारभाराबद्दल नगरसेवकांनी तक्रारी केल्या. गटातटात विभागल्याने राष्ट्रवादीचे नुकसान होत आहेत. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून नगरसेवकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. एकमेकांवर कुरघोड्या केल्या जात आहेत. विकासकामात दुजाभाव होत आहे, अशा तक्रारी नगरसेवकांनी पाटील यांच्याकडे केल्या.

स्थायी सभापती निवडीवेळी गैरहजर राहून नगरसेवकांनी राष्ट्रवादी नेत्यांनाच आव्हान दिले आहे. हे नाराज नगरसेवकही बैठकीला उपस्थित होते. त्यांचे म्हणणेही जयंत पाटील यांनी ऐकून घेतले. त्यामुळे फुटीर नगरसेवकांवर कारवाई होणार की त्यांना अभय दिले जाणार, याकडे लक्ष लागले आहे. कारवाई न झाल्यास राष्ट्रवादीचे काठावरचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याचीही धोका व्यक्त केला जात आहे.

‘स्वीकृत’साठी मोर्चेबांधणी

स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनीही जयंत पाटील यांची भेट घेतली. यात जमील बागवान यांचाही समावेश होता. काही कार्यकर्त्यांनी आमच्यापैकी कुणालाही द्या, असे साकडेही घातले. त्यावर जयंत पाटील यांनी कोणताच निर्णय दिला नाही. मात्र बागवान यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे.