...तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार

मनोज गायकवाड
Tuesday, 8 October 2019

करमाळा विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांचा अर्ज वेळेत माघारी घेणे शक्य झाले नाही मात्र, तेथे अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. याशिवाय सांगोला विधानसभेचे शेकापचे उमेदवार डॉ अनिकेत देशमुख यांना देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.

अकलूज : या देशाच्या इतिहासात भाजप सरकारच्या काळात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आली. हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास पहिल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही केला तर, पवारांची औलाद सांगणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करुन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. वेळापूर (ता. माळशिरस येथील बाजारतळ पटांगणात पार पडलेल्या या सभेच्या मंचावर आमदार ऍड. रामहरी रुपनवर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, तालुका अध्यक्ष माणिक वाघमोडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, पांडुरंग देशमुख, अँड. सुभाष पाटील, डॉ रामदास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माळशिरसच्या बदलत्या राजकारणाबाबत बोलताना पवार म्हणाले, 2009 च्या निवडणुकीत तुम्हाला पराभूत करण्यासाठी आम्ही सभा घेतल्या. पण आता आम्ही तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे अडचण उरलेली नाही. ही निवडणूक फार महत्त्वाची असून प्रस्थापितांच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. अच्छे दिनचे गाजर दाखाविणारे हे सरकार सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिला आणि तरुणांचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे असे सांगून, सरकारच्या अयशस्वी कामगिरीचा पट त्यांनी उलगडला. शिखर बँक आणि इडीने दाखल केलेला गुन्हा यातील विसंगतीची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी जानकर, आमदार रुपनवर, डॉ देशमुख आदींची भाषणे झाली.  निवडणूकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेऊन उत्तम जानकर यांना पाठिंबा जाहीर केलेल्या राजश्री लोंढे, उदय कांबळे, मनीषा कर्चे, आशोक नवगिरे, यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

करमाळा विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांचा अर्ज वेळेत माघारी घेणे शक्य झाले नाही मात्र, तेथे अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. याशिवाय सांगोला विधानसभेचे शेकापचे उमेदवार डॉ अनिकेत देशमुख यांना देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. अशी माहिती पवार यांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या आदेशाने मी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे अजित पवार यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. याबाबत आपण शरद पवार व जयंत पाटील यांना भेटून विचारणा करणार असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar talked about farmer loan waiver in Akluj