esakal | त्याच्या खुनासाठी दिली 10 लाखांची सुपारी 
sakal

बोलून बातमी शोधा

 NCP leader Anandrao Patil murdered with contract killing for 10 lacks

खटाव (ता. पलूस) येथील माजी सरपंच व राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा दहा लाखांची सुपारी देऊन खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

त्याच्या खुनासाठी दिली 10 लाखांची सुपारी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : खटाव (ता. पलूस) येथील माजी सरपंच व राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा दहा लाखांची सुपारी देऊन खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. दत्तात्रय रामदास जाधव (वय 33, निरा. ता. बारामती, पुणे), अतुल रमेश जाधव (वय 22, बावडा, खंडाळा, सातारा), लक्ष्मण बाबुराव मडीवाल (वय 60), अरविंद शंकर पाटील (वय 65, दोघेही खटाव, पलूस) अशी त्यांची नावे आहेत. यातील दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पूर्ववैमनस्य आणि जमिनीच्या खरेदीच्या वादातून काटा काढल्याची कबुली चौघांनी दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अधिक माहिती अशी, की लक्ष्मण मडीवाल याच्याविरोधात मृत आनंदराव पाटील यांनी वर्षभरापूर्वी भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मडीवाल कारागृहात होता. तो राग त्याच्या मनात कायम होता. दरम्यानच्या काळात अरविंद पाटील यांची साडेतीन एकर शेती आनंदराव पाटील यांनी विकत घेतली. बळाच्या जोरावर ही शेती घेतल्याने अरविंद पाटील यांचाही राग त्यांच्यावर होता.

दोघांनीही वर्षभरापूर्वी आनंदराव पाटील यांचा काटा काढण्याचे ठरवले होते. लक्ष्मण मडीवाल यास एका गुन्हेगाराने दत्तात्रय जाधव याची ओळख करून दिली. तो सुपारी घेऊन खून करीत असल्याचेही सांगितले. त्यानंतर चर्चा झाली. दत्तात्रय जाधवने खुनासाठी चाळीस लाखांची मागणी केली. तडजोडीनंतर दहा लाखांची रक्कम देण्याचे ठरले. 

दरम्यान, हल्लेखोर दत्तात्रय जाधवने मावस भावाचा मुलगा अतुल जाधव याच्यासोबत सहा महिन्यांपासून खटाव परिसरात नजर ठेवून होता. गल्ली न्‌ गल्ली त्यांनी पाठ करून ठेवली होती. आनंदराव पाटील रविवारी (ता.2) सकाळी घरातून दुचाकीवरून बाहेर पडले. त्यावेळी दत्तात्रय जाधव आणि अतुल जाधव हे त्यांच्या मागावर होते. मात्र, त्यांच्यासोबत लहान मुलगा असल्याने दोघांनीही हल्ला केला नाही.

त्यानंतर आनंदराव पुन्हा अकराच्या सुमारास शेतात गेले. त्यावेळी दुचाकीवर ते एकटेच असल्याने हल्लेखोरांनी त्यांच्या पाठलाग केला. अतुल दुचाकी चालवत होता. तर दत्तात्रयकडे अडीच फुटी कोयता होता. पावणे बाराच्या सुमारास खटाव- माळवाडी रस्त्यावर आनंदराव पाटील आल्यानंतर हल्लेखोर समोरून आले. क्षणात त्यांनी धारदार कोयत्याने पाटील यांच्या डोक्‍यात वर्मी घाव घातला. हातावरही वार केले आणि हल्लेखोरांनी पळ काढला. रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या आनंदराव पाटील यांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला होता. 

स्थानिक गुन्हे अन्वेषणसह सहा पथके या खुनाच्या प्रकाराचा तपास करीत होती. हा खून सुपारी देऊन झाल्याचे समोर आल्यानंतर त्या अनुषंगाने तपासाची सूत्रे हलविली. एलसीबीच्या पथकास धागेदोरे हाती लागल्यानंतर तत्काळ चौघांनाही अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. संशयित हल्लेखोर दत्तात्रय जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. लोणंद व निरा पोलिस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे त्याच्याविरोधात दाखल आहेत. 

पोलिस अधीक्षक श्री. शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक निरीक्षक सुनील हारूगडे, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अंतम खाडे, प्रदीप चौधरी, अभिजित सावंत, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, संदीप नलावडे, अनिल कोळेकर, अमित परीट, संजय कांबळे, साईनाथ ठाकूर, हेमंत ओमासे, वैभव पाटील, राजू मुळे, राजू शिरोळकर, जितेंद्र जाधव, विकास भोसले, प्रशांत माळी, सचिन कनप, मच्छिंद्र बर्डे, सचिन धोत्रे, विजयकुमार पुजारी यांचा कारवाईत सहभाग होता. 

कोयता परप्रांतीय बनावटीचा 
खुनासाठी वापरलेला कोयता सुमारे अडीच-तीन फूट लांबीचा विशिष्ट आकाराचा आणि परप्रांतीय बनावटीचा आहे. तो धागा लक्षात घेऊनही पोलिसांनी कर्नाटकसह सांगली, सातारा, कऱ्हाड येथे तपासाची सूत्रे हलवली. 

तांत्रिक तपास महत्त्वाचा 
खुनानंतर कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती आले नव्हते. पोलिस अधीक्षक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपास केला. सहा महिन्यांपूर्वीपासूनचे सर्व रेकॉर्ड तपासले. इतकेच नव्हे, तर खटावसह पलूस तालुक्‍यातील शेकडो सीसीटीव्ही. फुटेज पोलिसांनी तपासली. त्यानंतर आज एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. 

सहा महिन्यांपासून नियोजन 
हल्लेखोर सारईत असल्याने त्यांनी सहा महिन्यांपासून खुनाच्या कटाचे नियोजन केले होते. दोघेही खटावसह भिलवडी परिसरात दररोज येऊन रेकी करीत होते. गल्ली बोळ पाठ करून ठेवला होता. घटनेदिवशी दुचाकीवरून समोरून येऊन हा हल्ला चढवला. निर्जनस्थळी हा हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून दोघेही पसार झाले. नंतर पाचवा मैल येथे आले. नंतर ठरल्याप्रमाणे ते मोटार सायकवलवरून कऱ्हाडला निघून गेले. 

loading image