'त्या' मदतीच्या बॉक्सवरून जयंत पाटलांनी दिले स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांना पाठविण्याच्या मदत साहित्यावर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावल्याबद्दल काल सर्व पातळ्यांवर भाजपवर टीका झाली. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठविण्यात येणाऱ्या मदत साहित्याच्या खोक्यांवरही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याचे सोशल मिडियावरुन प्रसारित व्हायला लागल्यावर या पक्षाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

सांगली : पूरपरिस्थितीत आम्हाला कुठेही बॉक्स व पॅकिंगसाठी इतर साहित्य मिळत नव्हते, त्यामुळेच आम्ही हे बॉक्स वापरले. यात मदत देताना प्रसिद्धी करण्याचा अजिबात उद्देश नाही, असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. 

पूरग्रस्तांना पाठविण्याच्या मदत साहित्यावर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावल्याबद्दल काल सर्व पातळ्यांवर भाजपवर टीका झाली. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठविण्यात येणाऱ्या मदत साहित्याच्या खोक्यांवरही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याचे सोशल मिडियावरुन प्रसारित व्हायला लागल्यावर या पक्षाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह स्वतःचा फोटो असलेले स्टिकर मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटावर लावले होते. त्यानंतर सोशल मिडियावर भाजपवर टीकेची झोड उठली. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना कानपिचक्या दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खोक्यांवर त्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो असल्याचे वृत्त सोशल मिडियावर फिरु लागल्यावर भाजपने राष्ट्रवादीवर शरसंधान करण्याची संधी सोडली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करुन या प्रकाराबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. "दिनांक १ ऑगस्ट रोजी राजारामबापू पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध शाळांत वाटण्यासाठी खाऊचे बॉक्स तयार करण्यात आले होते. ४ तारखेपासून पुराची हि दुर्दैवी परिस्थिती उद्भवली. या पूरपरिस्थितीत आम्हाला कुठेही बॉक्स व पॅकिंग साठी इतर साहित्य मिळत नव्हते, त्यामुळेच आम्ही हे बॉक्स वापरले. यात मदत देताना प्रसिद्धी करण्याचा अजिबात उद्देश नाही. अजूनही आम्हाला बॉक्सची कमतरता आहे तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी बॉक्स व पॅकिंग मटेरियल पाठवावे.'' असे पाटील यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jayant Patil statement on flood relief work