उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादी तगडा उमेदवार देणार; यांचे नाव आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

उदयनराजेंवर टीकेची झोड 
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर कोणते दूरगामी परिणाम होतील, याची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती. यातूनच उदयनराजेंनी यापूर्वी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून मोदी आणि भाजपवर केलेल्या टीकेचे व्हिडिओ व्हायरल होत होते, तर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावरून सोशल मीडियावरील नेटिजन्सनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत होते. 

सातारा : खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्याने सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार हे निश्‍चित झाले असून, या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. त्यासाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाच्या चर्चेचा आज जोर होता. येत्या 22 सप्टेंबरला खासदार शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर येत असून, ते कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. दरम्यान, भाजपची महाजनादेश यात्रा उद्या (रविवारी) जिल्ह्यात येत असून, त्याचीही उत्सुकता असेल. 

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. त्यांनी काल मध्यरात्रीचा मुहूर्त साधत खासदारकीचा राजीनामा दिला आणि सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्यात भाजपचे कार्यकर्ते आणि उदयनराजेंच्या समर्थकांनी सकाळी पोवई नाक्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमून जल्लोषी वातावरणात फटाक्‍यांची आतषबाजी केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे समर्थकांना पेढे भरवून भाजपमध्ये स्वागत केले. या वेळी एक नेता एक आवाज... उदयन महाराज, उदयन महाराज... अशी घोषणाबाजीही झाली. विधानसभेच्या निवडणुकीसोबतच उदयनराजेंसाठी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, तसेच दोन्ही निवडणुका एकत्र होण्यात कोणतीही अडचण नसल्याचे शासकीय अधिकाऱ्यांकडूनही सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही निवडणुकीचे एकाच वेळी नोटिफिकेशन निघण्याची शक्‍यता आहे. परिणामी सातारा लोकसभेला उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार कोण, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. राष्ट्रवादीनेही आता उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. सध्यातरी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह आघाडीचे सर्वसमावेशक उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची नावे पुढे येत आहेत; पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोणाच्या नावाला होकार देणार हेही महत्त्वाचे आहे. 

भाजपच्या मेगाभरतीमध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. यामुळे कार्यकर्त्यांतही प्रचंड अस्वस्थता आहे. गड ढासळत असताना या गडाला सावरण्यासाठी व कार्यकर्त्यांना पुन्हा तितक्‍याच ताकदीने लढण्यासाठी चार्ज करण्याच्या उद्देशाने पुढील आठवड्यात 22 सप्टेंबरला पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते आपल्या दौऱ्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाच्या आगामी वाटचालीबाबतही चर्चा करणार आहेत, तसेच ते जिल्ह्यातील राजेशाहीला शह देण्यासाठीची कोणती रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

उदयनराजेंवर टीकेची झोड 
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर कोणते दूरगामी परिणाम होतील, याची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती. यातूनच उदयनराजेंनी यापूर्वी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून मोदी आणि भाजपवर केलेल्या टीकेचे व्हिडिओ व्हायरल होत होते, तर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावरून सोशल मीडियावरील नेटिजन्सनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत होते. 

नरेंद्र पाटील-पवार भेटीने खळबळ 
दिवसभराच्या घडामोडींत भाजपमध्ये प्रवेश करून शिवसेनेच्या कोट्यातून सातारा लोकसभेची निवडणूक लढलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले; पण ही भेट पूर्वनियोजित होती. माथाडी कायद्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने यासंदर्भात आम्ही श्री. पवार यांची भेट मागितली होती. नेमके उदयनराजेंनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि मी श्री. पवार यांची भेट घेतली. हा निव्वळ योगायोग असल्याचे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याचा असून, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेच या जागेबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. त्याचीही जोरदार चर्चा येथे झाली. 

उदयनराजे आज काय बोलणार..? 
भाजपची महाजनादेश यात्रा उद्या (रविवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, वाई, सातारा आणि कऱ्हाडला सभा होणार आहेत. या यात्रेत मुख्यमंत्र्यांसोबत उदयनराजे भोसलेही सहभागी होणार आहेत. बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे ते आता काय बोलणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीसोबत असताना भाजपवर सडेतोड टीका करणारे उदयनराजे आता भाजपमध्ये गेल्यावर राष्ट्रवादी व कॉंग्रेसवर कोणते तोंडसुख घेणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. 

बालेकिल्ला शाबूत राहील : शिंदे 
"राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भक्कमपणे उभा आहे. भाजपसारखा लोकप्रिय पक्ष इतर पक्षातील लोकांना फोडून आपल्या पक्षात घेत आहे. त्यांच्या पक्षातील मूळच्या कार्यकर्त्यांत याबाबत नाराजी आहे. पडझडीनंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या विश्‍वासावर संघर्ष करून भरारी घेईल. पवार साहेबांसारखे सक्षम नेतृत्व आमच्या सोबत असल्याने बालेकिल्ल्यात कुठेही फरक पडणार नाही. येत्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर सर्वांना येईल,'' असे राष्ट्रवादीचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. 

हा जिल्हा पवारांना मानणारा : पाटील 
"राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा शरद पवार यांच्या पाठीशी राहिला आहे. पवार साहेबांवर येथील जनतेचे प्रेम आजही कायम आहे. सध्या जिल्ह्यात थोडीफार पडझड झाली असली, तरी त्यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा बहुमताने निवडून देईल,'' असे वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP prepare for Satara Loksabha constituency contest against Udyanraje Bhosale