Political News I तुम्ही राजीनामा द्या, आमदार राष्ट्रवादीचा करु; सेना नेत्याला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

'अहंकाराची भाषा शोभत नाही, एवढेच वाटत असेल तर राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा'

तुम्ही राजीनामा द्या, आमदार राष्ट्रवादीचा करु; सेना नेत्याला टोला

विटा : ‘‘खानापूर मतदार संघातील सर्व पाणी योजना मीच आणल्या, मी सर्व काम केले, माझ्यामुळे झाले, माझे श्रेय आहे. हा ‘मी’पणा आमदार करीत आहेत, ते योग्य नाही. संपतराव अण्णा, नागनाथअण्णांसह परिसरातील अनेक लोकप्रतिनिधींपासून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत अनेकांचे योगदान पाणी योजनेसाठी आहे. मोठेपणा दाखवून आमदारांनी मान्य करायला पाहिजे. श्रेय घ्यायचेच तर एवढा वेळ का लागला? महत्त्वाच्या ‘बंद’ संस्थांचीही जबाबदारी घ्यावी. ‘चांगलं झालं तर माझं...’ हे योग्य नाही. ‘सत्तेची खुमखुमी येऊ देऊ नका,’ असे तुम्हीच सांगता. आता हे बोलणे काय दर्शवते? अहंकाराची भाषा शोभत नाही. एवढेच वाटत असेल तर राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा; मग बघा राष्ट्रवादीचा आमदार होतो की नाही ते,’’ असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते ॲड. वैभव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर, तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, शहराध्यक्ष अविनाश चोथे, ऐनवाडीच्या सरपंच सजाबाई तुपे यांची उपस्थिती होती. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या आघाडी शासनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महत्त्वाचा घटक आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित गावांच्या शेती-पाण्याचा प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार मांडला, आग्रह धरला. त्याला त्यांनी विनाविलंब प्रतिसाद देत निर्णय घेतला. टेंभूच्या ६ अ व ६ ब या टप्प्यांना मंजुरी दिली. त्याचा आनंद आम्ही साजरा केला. पेढे वाटले, फटाके वाजवले, तर पोटशूळ का, हे खानापूरच्या जनतेला समजले नाही.’’

हेही वाचा: मुंबईत NIA ची कारवाई, माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणींची मालमत्ता जप्त

‘‘राष्ट्रवादीचा आमदार २०१९ लाच केला असता. तुम्ही वरिष्ठ पातळीवरून राजकीय दबाव आणला व निवडणूक जिंकलीत. आमदारकीचा एवढा गर्व अन् अहंकार असेल तर द्या राजीनामा अन् या मैदानात. आम्हीही तयार आहोत, ठरवू द्या लोकांना,’’ असे आव्हान ॲड. पाटील यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत बिनविरोध निवडून दिले, हे विसरू नका. विटा नगरपरिषदेत तुम्ही वारंवार करीत असलेला हस्तक्षेप, अधिकाऱ्यांना दमदाटी व कार्यकर्त्यांच्या अडवणुकीबाबतही उत्तर द्यायला पाहिजे होते. त्याबद्दल खानापूर राष्ट्रवादीच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री व आघाडीच्या प्रमुखांकडे तक्रार करणार आहोत.’’

ऐनवाडीचा अपमान केला - दाजी पवार

ऐनवाडीचे उपसरपंच दाजी पवार म्हणाले, ‘‘ऐनवाडीची पाणी योजना मंजूर झाली, पूजन खासदारांच्या हस्ते घेतले. आमदारांनी पुन्हा पूजनाचा घाट घातला. लोकनियुक्त सरपंचांना बोलावले नाही. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत व गावाचा अपमान केला आहे.’’ राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बेनापूरचे नेते सचिन शिंदे म्हणाले, ‘‘बेनापूर योजनेच्या मंजुरीबाबत घाटमाथ्यावरील मंडळींनी पाठपुरावा केला. पाण्याचा स्रोत व अन्य सुविधांबाबत विचारणा होऊन स्वतंत्र योजना मंजूर करण्याचा प्रयत्न केला. बेनापूर, सुलतानगादेसह पाच गावांचा समावेश त्यात होता. खासदार संजय पाटील व अन्य लोकप्रतिनिधींच्या काम माध्यमातून झाले; मात्र आमदारांनी काम बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कामांबाबत जरूर प्रयत्न करावेत व श्रेय घ्यावे; इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नये.’’

हेही वाचा: 'शिवसेनेला हिंदुत्वाची जाहिरात करावी लागते, पाहून कीव येते'

Web Title: Ncp Vaibhav Patil Vita Criticized To Shiv Sena Mla Anil Babar In Vita Sagnli Resignation Of Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top