कोगनोळीजवळ पोलिस बंदोबस्त कडक ; बेळगाव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

अनिल पाटील
Thursday, 21 January 2021

पोलिसांनी काही वाहनांना परतही पाठविले. यावेळी महामार्गावर वाहनांची रांग लागली होती.

कोगनोळी (बेळगाव) : बेळगाव येथे मराठी भाषिकांतर्फे आज (ता. २१) महापालिकेवर काढण्यात येणारा मोर्चा स्थगित केला आहे. या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासह दक्षता म्हणून राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीजवळ सकाळपासूनच अर्ध्यावर बॅरिकेड्स लावून पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला. पोलिसांनी काही वाहनांना परतही पाठविले. यावेळी महामार्गावर वाहनांची रांग लागली होती.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर तणाव झाल्यास सर्वप्रथम कोगनोळी नाक्यावर नेहमी सतर्कता पाळली जाते. आजही त्याचा वाहनधारकांना प्रत्येय आला. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी सर्व चारचाकी वाहने या ठिकाणी तपासून सोडण्यात आली. कोल्हापूर येथील शिवसेनेचे नेते विजय देवणे हे बेळगावला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व चारचाकी वाहनधारकांना ओळखपत्र दाखवूनच प्रवेश देण्यात येत होता. 

हेही वाचा - शेती क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटावी म्हणून अक्षय शेतात नव-नवे प्रयोग करत आहे 

शिवसेना असा मजकूर असलेल्या वाहनांना देखील प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटकात इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना रोखून महाराष्ट्रात परत पाठविण्यात आल्याने बऱ्याच लोकांची गैरसोय झाली. बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मोर्चाला स्थगिती दिली असून यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे तणाव न वाढण्यासाठी बंदोबस्त कडक केला होता. 

कोगनोळी येथे निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, खडकलाट पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश मंटूर, निपाणी बसवेश्वरचौक पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता राठोड यांच्यासह एएसआय एस. ए. टोलगी व अन्य वीस पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते.

गडहिंग्लज, चंदगड, आजऱ्यातील वाहनधारंकांची गैरसोय

महाराष्ट्रातून कर्नाटक हद्दीतून गडहिंग्लज, चंदगड, आजरा या ठिकाणी जाणाऱ्या चारचाकी वाहनांवर शिवसेना असा उल्लेख असल्यास त्यांना देखील कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात आला. येथील दूधगंगा नदीवरूनच ही वाहने परत पाठविण्यात आली. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली.

हेही वाचा - ‘नवीन योजना आलीया सजना, बघा जरा न्याहाळून नीट, टाका तुम्ही पाईपलाईन थेट...’

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: near kognoli checking for vehicle from police in road in belgaum