संचारबंदीचा नवा नियम ; महामंडळाकडे आदेशच नाही...... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

शासनाने रविवार पासून रात्री आठ ते पहाटे पाच याकाळात संचारबंदी लागू केली आहे. मात्र,

बेळगाव :  शासनाच्या सायंकाळच्या संचारबंदीच्या नियमामुळे बससेवेवर परिणाम जाणवणार आहे. शासनाने रविवार पासून रात्री आठ ते पहाटे पाच याकाळात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, अद्याप याबाबत स्पष्ट आदेश परिवहन मंडळाला प्राप्त झाले नसल्याने मंडळामध्ये बसच्या वेळापत्रकावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. 

राज्यात सध्या रात्री नऊ ते पहाटे पाच यावेळेत संचारबंदी लागू होती. तरीही परिवहन मंडळाकडून रात्री नऊ वाजता रस्त्यावर बसेस सोडल्या जात होत्या. अनलॉक 1.0 मुळे आलेली लॉकडाउनची शिथीलता आणि प्रवाशांचा रात्रीच्या बससाठी वाढता प्रतिसाद यामुळे महसूल वाढीच्या उद्दिष्टाने बसेस सुरु करण्यात आल्या होत्या. सध्या आंतरजिल्हा बसेसही सोडल्या जात असून रात्री नऊनंतरही अनेक बसेस बेळगावातून राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात जात आहेत. मात्र, शासनाने अचानक संचारबंदीचा कालावधी एक तासाने वाढवत रात्री आठ वाजताच ती लागू केली आहे. त्यामुळे परिवहन मंडळासमोर समस्या निर्माण झाली आहे. रात्री आठनंतर बसेस सोडाव्यात की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 

हेही वाचा- महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचे आहे असा आहे नियम वाचा.... -

बस वेळापत्रकावरुन परिवहन गोंधळात ​

रात्री आठ वाजताच बसेस बंद केल्यास जिल्ह्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांनाही ते गैरसोयीचे ठरणार आहे. रात्री नऊनंतर बंगळूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना सायंकाळी आठपूर्वीच बसस्थानकावर हजर व्हावे लागेल. अन्यथा त्यांना घरापासून बसस्थानकापर्यंत येण्यासाठी कोणतीच वाहतुकीची साधने उपलब्ध होणार नाहीत. सध्या शहर आणि ग्रामीण भागात रात्री नऊनंतरही बसेस फिरत होत्या. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये काम करणाऱ्या कामगारवर्गाला रात्री नऊनंतरची बससेवा फायदेशीर ठरली होती. मात्र आता शासनाच्या नव्या आदेशानुसार पुन्हा परिवहनच्या बसेस रात्री आठ वाजता आगारात परताव्या लागणार आहेत. दरम्यान, अद्याप आदेश नसल्याने परिवहनची कोंडी झाली आहे. 

हेही वाचा-शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश ;  या शिक्षकांना मिळणार वर्क फ्रॉम होमच.... -

""परिवहन मुख्यालयाकडून अद्याप कोणताच आदेश मिळालेला नाही. त्यामुळे सेवा नियमीत सुरु ठेवली जाणार आहे. नवा आदेश आल्यानंतरच रात्री आठपर्यंत सेवा दिली जाईल. सोमवारपर्यंत नवा आदेश मिळण्याची शक्‍यता आहे.'' 
-महादेव मुंजी, नियंत्रक, परिवहन मंडळ बेळगाव विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New curfew rules The corporation has no order yet in belguam