गांजा नशेबाजांच्या नव्या टोळ्या: चोऱ्या, जाळपोळ, गुंडागर्दी... तरीही पोलिस गप्प का?

अजित झळके
Monday, 14 September 2020

गांजा हा इथे तंबाखूइतका सहज मिळतो. अत्यंत महागडे अमली पदार्थ मात्र सांगलीसारख्या शहरात अजिबात परवडणारे नसल्याने येथे गांजा पार्ट्या हीच नशेबाजांची चैन ठरते आहे... 

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा अमली पदार्थांचे रॅकेट चर्चेत आले. मुंबईत, सिनेमाजगतात या सामान्य गोष्टी आहेत. या प्रकरणात सध्या रिया चक्रवर्ती हिच्यासह तिच्या भावाला अटक झाली आहे. त्यानिमित्ताने अमली पदार्थ, त्यांचे सेवन आणि सांगलीसारख्या छोट्या शहरांशी त्याचे कनेक्‍शन या गोष्टीही चर्चेत आहेत. उत्तर भारतातून आणि परदेशातून शिक्षणाच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या काही जणांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रकार होत असल्याचे सांगितले जाते. गांजा हा इथे तंबाखूइतका सहज मिळतो. अत्यंत महागडे अमली पदार्थ मात्र सांगलीसारख्या शहरात अजिबात परवडणारे नसल्याने येथे गांजा पार्ट्या हीच नशेबाजांची चैन ठरते आहे... 

यासंदर्भात सांगलीतील एका प्रख्यात डॉक्‍टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की सांगलीत आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी कमी आहे. त्यातही उत्तर भारतातून इथे शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या काही तरुणांची नावे चर्चेत असतात. इथे गांजा ओढणाऱ्यांची संख्या मात्र मोठी आहे. हुक्का पार्टीतून नशा केली जाते. हे तरुण जेव्हा नशेच्या आहारी जातात, तेव्हा त्यांचे पालक त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सांगलीतील डॉक्‍टरांचा सल्ला घ्यायचे टाळतात. त्यामुळे पुण्यात जाऊन त्यावर उपचार घेण्याचे प्रमाण जास्त आहे. पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रात अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने दाखल झालेल्या सांगलीकर तरुणांची संख्या दुर्लक्ष करता येणार नाही, इतकी नक्कीच आहे. 

"सकाळ'चे स्टिंग अन्‌ गांजा सहज उपलब्ध 

तंबाखू मिळावा तशा पद्धतीने गांजा उपलब्ध होतो, हे "सकाळ'ने या आधी स्टिंग ऑपरेशनद्वारे स्पष्ट केले होते. मिरजेतील एका साखळीशी आम्ही संपर्क साधला होता. त्यांनी चारशे रुपयांना छोट्या पुडीत गांजा खरेदी करून दिला. तो पुरावा म्हणून छापला होता. मिरज शहरात गांजाचे मोठे कनेक्‍शन आहे. जत तालुक्‍यात अनेक जण दाट पिकात गांजा घेतात, हे अनेकदा उघडकीस आले आहे. तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर नारायणखेड नावाच्या एका गावात गांजा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. गांजाची आवक तिथून जास्त होते. सांगलीत शंभर फुटी रस्ता, खणभाग, संजयनगर येथील तीनशेहून अधिक तरुण गांजाच्या आहारी गेल्याचे सांगण्यात आले. खणभागात पाण्याच्या टाकीखाली, शंभर फुटीला काटेरी झुडपांमध्ये गांजा पार्ट्या चालतात. 

औषधांचा ओव्हरडोस 
काही तीव्र वेदनाशामक गोळ्या, काही विशिष्ट कंपन्यांची खोकल्याची औषधे ही अतिप्रमाणात सेवन केल्यानंतर अमली पदार्थासारखेच काम करतात. स्थानिक तरुणांमध्ये अशा पद्धतीचे व्यसन करणारे अनेक जण आहेत. ही औषधे डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नयेत असे आदेश आहेत; परंतु काही मेडिकल दुकानांतून जादा पैसे घेऊन ती दिली जात असल्याचे एका जाणकाराने सांगितले. 

नशेत जाळपोळ 
सांगलीत शंभर फुटी रस्त्यावर काही दिवसांपूर्वी गाड्या पेटवण्याचा प्रकार घडला होता. त्यात नशेबाजांचा सहभाग होता. गांजाची नशा करून त्या नशेत त्यांनी गाड्या पेटवून दिल्या होत्या. अगदी शंभर रुपये खर्च करून दोन ते तीन जण गांजाची नशा करत असल्याने त्यात अनेक जण अडकत निघाले आहेत. याबाबत शहर पोलिसांत तक्रार केलेल्या एका व्यक्तीने सांगितले, की कित्येक तरुणांनी नशेच्या प्रभावाखाली घरातील व्यक्तींनाही मारहाण केली. 

टोळ्यांची दहशत 
येथे 16 ते 35 वयोगटातील गांजाबाजांनी आपल्या टोळ्या बनवल्या आहेत. या टोळ्यांनी चोरी, लूटमार, वाटमारी आणि जाळपोळीचे प्रकार केले आहेत. शंभर फुटी रस्त्यावर या टोळ्यांमुळे रात्रीच्या वेळी फिरताना सामान्य माणसाला भीती वाटावी, अशी स्थिती आहे; मात्र पोलिसांकडूनही दुर्लक्ष केले जात आहे.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New gangs of cannabis addicts in Sangali