
मिरज - शिवजयंतीच्या मावळतीलाच मिरज शहरात कुपवाड रस्त्यावर एका कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून टाकलेले स्त्री जातीचे अर्भक मिळाले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या बालकाचे प्राण वाचले.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या बालकाच्या रडण्याचा आवाज ऋषिकेश महिंद्रकर यांना ऐकू आला. त्यानी बॅटरीचा प्रकाशात पाहिले असता काटेरी झुडपात कचऱ्यामध्ये या बालकाचा रडण्याचा आवाज ऐकून त्याने तातडीने ही प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली. यावेळी बालकाला तांबड्या मुंग्यांनी वेढले होते. याच मुंग्यांच्या चाव्यामुळे बालकाचा आक्रोश सुरू होता. त्याने तातडीने ही घटना पोलिसांना कळवली. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी स्वतः घटनास्थळी येऊन बालकास उचलून घेतले. आणि तातडीने शासकीय रुग्णालयात नेले.
बालकाला सांभाळण्याची जबाबदारी पाठक अनाथालयावर
सध्या बालक रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असले तरी त्याची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. दरम्यान हे बालक अशा अवस्थेत बेजबाबदारपणे फेकून देणा-या व्यक्तीचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत. या बालकाला सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा बालकल्याण समितीने येथील पाठक अनाथालयावर सोपवली आहे. या अनाथालयाचे कर्मचारी सध्या रुग्णालयात या बालकाची काळजी घेत आहेत.