वार्तापत्र खानापूर नगरपंचायत : सर्वाधिक निधी मिळाला, पण...

अनिलदत्त डोंगरे
Wednesday, 13 January 2021

खानापूर नगरपंचायतीने पहिल्या पाच वर्षांत मोठा निधी मिळवून नजरेत भरणारी विकासकामे कामे केली आहेत, असा दावा सताधाऱ्यांकडून केला जात आहे.

खानापूर (जि. सांगली) : खानापूर नगरपंचायतीने पहिल्या पाच वर्षांत मोठा निधी मिळवून नजरेत भरणारी विकासकामे कामे केली आहेत, असा दावा सताधाऱ्यांकडून केला जात आहे. सत्ताधाऱ्यांनी स्वप्ने दाखवली, पण कामे केली नाहीत. त्यामुळे लोक निराश आहेत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

निधी मिळविणारी नगरपंचायत म्हणून खानापूर नगरपंचायतीची नवी ओळख निर्माण झाली आहे. नगरपंचायत स्थापनेनिर्मितीनंतर नवीन कारभार ग्रामपंचायतीच्या मोडकळीस आलेल्या इमारतीत सुरू झाला. मात्र, नंतर युवा नेते सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी गटाने इमारतीची डागडुजी, रंगरंगोटी, फर्निचर दुरुस्ती करीत कारभार सुरू ठेवला. आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून नगरपंचायतीला तीन कोटींचा निधी नुकताच मिळाला. त्यामुळे नगरपंचायतीची नवीन अद्ययावत इमारत लवकरच तयार होणार आहे. प्रत्येक समाज घटकासाठी स्वतंत्र दफनभूमी, स्मशान भूमीची कामे होणार आहेत. 

नगरपंचायतीने विकासकामांबरोबर स्वच्छतेला महत्त्व देऊन शासनाच्या विविध स्वच्छता अभियान व स्पर्धेत भाग घेऊन खानापूर निर्मलग्राम केले आहे. माजी नगराध्यक्षा भारती माने यांच्या कारकिर्दीत देशात क्रमांक मिळवून अडीच कोटी रुपयांचे बक्षीसही मिळवले. मार्च 2021 महिन्यात केंद्राच्या होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात नगरपंचायतीने भाग घेतला. त्याची तयारी जोरदारपणे सुरू आहे. नागरिकांनी सर्वेक्षणात भाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष तुषार मंडले, उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर यांनी केले आहे. 

बांधकाम सभापती उमेश धेंडे, पाणी पुरवठा सभापती भारत सरगर, आरोग्य सभापती ज्ञानदेव बाबर यांच्या नव्याने निवडी नुकत्याच झाल्या. वर्षापासून बांधकाम सभापती पदावर असलेल्या उमेश धेंडे यांनी शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कामे मंजूर करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध केल्या जात आहेत, असे सांगितले जाते. 

नगराध्यक्ष तुषार मंडले म्हणाले,""घाटमाथ्याचे युवा नेते सुहास (नाना) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीने विकासकामांच्या जोरावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे. शहरातील सर्व नागरिकांच्या मदतीने स्वच्छता अभियानात नगरपंचायतीने विविध बक्षिसे मिळवीत देशात क्रमांक पटकावला आहे. पुढील काळात प्रस्तावित कामे मंजूर करून पूर्ण करणार आहे.'' 

आकारलेले विविध कर नागरिकांनी वेळेत भरणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजना नगरपंचायतीद्वारे प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. देशातील पश्‍चिम विभागात खानापूर नगरपंचायतीस वनस्टार नामांकन मिळाले आहे. मंजुरी मिळालेली प्रमुख रस्त्यांची कामे लवकरच सुरू होतील. दोन कोटी निधी उपलब्ध आहे. "माझी वसुंधरा...' व प्रदूषण रोखण्यासाठी "रविवार नो व्हेहिकल डे' म्हणून साजरा करण्याचा उपक्रम राबविणार आहे, असेही सांगितले. 

अपुरे कर्मचारी 
संवर्ग विभागात कर निरीक्षक 1, लिपिक 3 एवढे कर्मचारी आहेत. स्थापत्य अभियंता 1, करनिरीक्षक 1, लिपिक 2 अशी चार पदे भरण्याची गरज आहे. सफाई कामगार 6 कायमस्वरूपी भरणे गरजेचे आहे. सध्याचे सफाई कामगार कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेले आहेत. कारभार चालवताना कर्मचारी अपुरे पडत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तांत्रिक कामे पूर्ण करण्यास वेळ जात आहे. 

स्वप्ने आणि निराशा... 

सत्ताधारी गटाने सुरवातीला खानापूरच्या सर्वांगीण विकासाची स्वप्ने दाखवली. कामे झाली नसल्याने जनतेचा भ्रमनिरास झाला. आगामी काळात जनतेला बदल हवा आहे. विकासासाठी राजेंद्र माने यांचेच नेतृत्व हवे, अशी टीका विरोधी पक्ष नेते आनंदराव मंडले यांनी टीका केली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newsletter Khanapur Nagar Panchayat: Most funds received, but ...