मिळून नऊजणींनी उभारले वाचनप्रेमींसाठी वाचनालय

अजित झळके
Monday, 11 January 2021

आकाशवाणी परिसरातील नऊ महिलांनी ते करून दाखवलंय.

सांगली : 'स्क्रीन ऍडिक्‍ट'ची समस्या एका गंभीर वळणावर असताना त्याला सक्षम पर्याय देऊन मुलांना, महिलांना, ज्येष्ठांना वाचनाची आवड लावणं इतकं सोप नाही. त्यासाठी खूप झटावं लागतं, सातत्य ठेवावं लागतं. आकाशवाणी परिसरातील नऊ महिलांनी ते करून दाखवलंय. 8 मार्च 2018 रोजी त्यांनी 'वाचनप्रेमी वाचनालय' संकल्पनेचं बीजारोपन केलं. दोन वर्षात हा प्रयोग चळवळ बनला आहे. 

या संकल्पनेविषयी विजया हिरेमठ सांगतात, नऊजणींनी विचार केला की मुलांना, स्वतःला वाचनासाठी काहीच सोय नाही. आमच्या घरी छोटं वाचनालय करायचं ठरलं. सर्वांनी पुस्तकं जमवली. मोठ्यांसाठी 150, लहानांसाठी 100 पुस्तके जमली. सोशल मिडियातून खूप चर्चा झाल्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद, नगर, नागपूरमधून पुस्तके भेट आली. खूप पुस्तके जमली. वाचक कमी पडायला लागले. आम्ही येथील संवाद ग्रुपच्या सोबत गेलो. त्यांच्याकडे पालक, मुलांचा संच मोठा आहे. त्यातून संवाद कट्टा सुरु झाला. सांगली, मिरज, कवलापूर येथे 13 ठिकाणी तो भरतो. 

हेही वाचा - मी, माझी पत्नी आणि वडील या अपघातामुळे धास्तावलो आहोत

 

महिलांना वाचनाची आवड लागावी म्हणून संवादिनी ग्रुप स्थापन केला. दर 15 तारखेला आम्ही एकत्र जमतो, पुस्तकांचे देवाण-घेवाण करतो. वाचलेल्या पुस्तकांवर दोन तास गप्पा मारतो. कोरोना लॉकडाऊन काळात घरोघरी पुस्तकांचा उपक्रम सुरु केला. 250 रुपयांत 250 पुस्तके वाचा, या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. त्या रकमेतून नवीन पुस्तके खरेदी केली. आता आमच्याकडे एक हजार पुस्तके मोठ्यांसाठी आणि अडीच हजार पुस्तके मुलांसाठी आहेत. ज्येष्ठांसाठी घरी जावून पुस्तक देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. एक रोपटे लावले होते, त्याचा इतका विस्तार झाला. आम्ही नऊजणी होतो, आता मोठा परिवारच झाला. 

मिळून नऊजणी 

या उपक्रमाची सुरवात विजया हिरेमठ, सुनंदा कदम, अमृता पवार, अश्‍विनी वाघ, अक्षता जोशी, पल्लवी माने, केतकी बाबर, निलम बाबर, शुभांगी पेंढारकर यांनी केली. वाचन कट्ट्यासाठी श्‍वेता चितळे, मानसी गोखले, दीपा ताथवडेकर, सपना कापत्रवार, शिल्पा गरगटे, प्रतिमा कुंभारे, प्रांजली माळी, अर्चना माळी आणि संवाद ग्रुपच्या अर्चना मुळे यांची मदत होते.  

हेही वाचा - लेकरांना पाहायला जीव झाला कासावीस

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine lady start a library for people in sangli